२०१४ च्या तुलनेत मागील वर्षी अधिक पाऊस झाला, तरी या वर्षी जिल्ह्य़ात टंचाईची तीव्रता अधिक आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी एप्रिलमध्ये टँकरची संख्या वाढली असून मध्यम व लघु प्रकल्पांमधील साठाही तुलनेने कमी झाला आहे.
२०१४ मध्ये जिल्ह्य़ात ३६६ मिमी म्हणजे अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ५८ टक्के पाऊस झाला होता. २०१५ मध्ये ४५८ मिमी म्हणजे सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पावसाची नोंद झाली. असे असले, तरी या वर्षी एप्रिलच्या मध्यावधीनंतर मध्यम व लघु प्रकल्पांतील उपयुक्त साठा मात्र आधीच्या वर्षांच्या तुलनेत कमी आहे. गेल्या पावसाळ्यात जिल्ह्य़ात झालेल्या पावसात मोठी अनियमितता होती. २३ जून ते ३ ऑगस्ट दरम्यान पावसाने ४२ दिवसाचा खंड दिला. पुन्हा १७ ऑगस्टनंतर पावसाने १७ दिवसांचा खंड दिला. गेल्या जुलैमध्ये १४ मिमी म्हणजे अपेक्षेच्या तुलनेत सरासरी आठ टक्केच पाऊस झाला, तर ऑक्टोबरमध्येही अपेक्षेच्या तुलनेत सरासरी २१ टक्केच पाऊस झाला.
अगोदरच्या वर्षांच्या तुलनेत गेल्या पावसाळ्यात अधिक पावसाची नोंद झाली, तरी या वर्षी ७ मध्यम व ५७ लघु प्रकल्पातील उपयुक्त साठा तुलनेत कमी आहे. १५ एप्रिलला या प्रकल्पातील हा साठा ५ टक्के होता. मध्यम प्रकल्पात काहीसा उपयुक्त जलसाठा असला, तरी लघु प्रकल्पात तो एक टक्काही नाही. मागील वर्षी एप्रिलमध्ये कोरडय़ा असलेल्या बदनापूर तालुक्यातील ऊध्र्व दुधना प्रकल्पात सध्या ३२ टक्के, तर जालना तालुक्यातील कल्याण गिरजा प्रकल्पात १६ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी १६ एप्रिल रोजी जिल्ह्य़ातील टँकरची संख्या १४५ होती. या वर्षी याच तारखेस ती ४१६ वर पोहोचली. सर्वाधिक टँकर (७४) अंबड तालुक्यात असून त्या खालोखाल टँकरची संख्या (६९) भोकरदन तालुक्यातील आहे. गेल्या वर्षी १६ एप्रिलला जालना तालुक्यात १२ टँकर होते. या वर्षी याच तारखेस जालना तालुक्यातील टँकरचा आकडा ६१ आहे.
अन्य तालुक्यातील १६ एप्रिलला असणाऱ्या टँकरची संख्या पुढीलप्रमाणे- कंसातील आकडे याच दिवशीच्या टँकरचे : बदनापूर ४६ (३१), जाफराबाद ७१ (७), भोकरदन ६९ (७), परतूर २८ (४), मंठा ५० (९), अंबड ७४ (४८) व घनसावंगी ५४ (२७). या वर्षी आतापर्यंत जिल्ह्य़ात ५७९ खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या. पैकी ११९ जालना तालुक्यातील, बदनापूर ५९, भोकरदन ८०, जाफराबाद ७१, परतूर ५३, मंठा ३४, अंबड ८५ व घनसावंगी ७८ याप्रमाणे अधिग्रहीत खासगी विहिरींची संख्या आहे.
एप्रिल ते जून दरम्यान पाणीटंचाई निवारणासाठी १९ कोटी २८ लाख रुपये खर्चाचा आराखडा आहे. ९३६ गावांमध्ये आणि २११ वाडय़ांत वेगवेगळ्या १ हजार १४४ योजना या काळात प्रस्तावित आहेत. या तीन महिन्यातील सर्वाधिक ३ कोटी ९५ लाख रुपये खर्चाच्या योजना भोकरदन तालुक्यात प्रस्तावित आहेत. या तालुक्यातील १४३ गावे व ५० वाडय़ातील पाणीटंचाई निवारणासाठी या योजना आहेत. टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकारी पातळीवर, तर विहीर अधिग्रहणाचे अधिकार संबंधित तहसीलदारांना देण्यात आले आहेत.