नगर व नाशिक जिल्हय़ातून जायकवाडीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा वेग कमी असल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी झिरपण्याचे प्रमाण या वर्षी वाढले आहे. ४५ टक्के पाणी कमी येईल, असा अंदाज आहे. आतापर्यंत वरील धरणातून ८.४३ टीएमसी पाणी सोडण्यात आले असून, त्यापैकी केवळ ४.८८ टीएमसी पाणी जायकवाडी जलाशयात पोहोचले आहे. दरम्यान, निळवंडे धरणातून २ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. ही त्या धरणातून पाणी सोडण्याची कमाल क्षमता असल्याने किमान आणखी २० दिवस पाण्याची आवक सुरू राहील.
जायकवाडी जलाशयात वरील धरणातून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिल्यानंतर १ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात आले. मात्र, वरील धरणातील पाणीसाठा ‘स्पील वे’वरून देताना निळवंडे धरणातून केवळ २ हजार क्युसेक एवढय़ा वेगानेच पाणी सोडता येते. त्यामुळे पाण्याचा वेग मंदावलेला आहे. हळूहळू येणाऱ्या पाण्यामुळे जमिनीत मुरण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाणी सोडूनही ३९ टक्के पाणी झिरपले होते. या वर्षी ते प्रमाण ४५ टक्क्य़ांपर्यंत गेले आहे. अजूनही ४.५ टीएमसी पाणी सोडणे बाकी आहे. ज्या वेगाने पाणी येत आहे, त्यामुळे पाणी झिरपण्याचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे.