सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती उदय ललित यांचे प्रतिपादन

देशात अलीकडच्या काळात जे स्थापन झालेले खंडपीठ आहेत, ते औरंगाबाद खंडपीठाची प्रेरणा घेऊनच अस्तित्वात आले आहेत. औरंगाबाद हे तसे तरुण न्यायालय आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती तथा तलाक प्रकरणातील पाच पिठाच्या न्यायमूर्तीतील एक असलेले उदय ललित यांनी येथे केले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील संत तुकाराम महाराज नाटय़गृहात रविवारी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयातील न्या. नरेश पाटील होते. व्यासपीठावर न्या. आर. एम. बोर्डे, न्या. शंतनू केमकर, मुंबईचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, खंडपीठ वकील बार असोसिएशनचे आर. एम. देशमुख, आनंदसिंह बयास आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविक ते आभार प्रदर्शनापर्यंतच्या कार्यक्रमात सर्वानीच इंग्रजीतून मनोगत व्यक्त करीत असताना न्यायमूर्ती ललित जेव्हा मार्गदर्शनासाठी आले तेव्हा त्यांनी, तुम्हाला मराठीत बोलले तर चालेल का, असे विचारून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर संपूर्ण सभागृहातून प्रतिसाद मिळताच न्यायमूर्ती ललित यांनी संपूर्ण प्रतिपादन मातृभाषेतून केले. आपण मूळचे सोलापूर असल्याचे सांगत न्यायमूर्ती ललित म्हणाले, औरंगाबाद खंडपीठ १९८१ साली स्थापन झाल्यानंतर देशात मदुराई, गुलबर्गा, धारवाडसह पूर्वाचलमधील मेघालय, मणिपूर व त्रिपुरा राज्यातही खंडपीठ स्थापन झाले. यासाठी औरंगाबाद खंडपीठ ज्या स्टेट ऑर्गनायझेशनवरून स्थापन झाले, त्याचा आधार घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य म्हणून अस्तित्वात आल्यापासून नागपूर खंडपीठ सुरू आहे. त्यानंतर सुमारे २१ वर्षांनंतर औरंगाबाद खंडपीठासाठी लढा सुरू झाला. व्ही. एस. देशपांडे यांचे त्यासाठी मोठे योगदान ठरले आहे. आज नागपूर खंडपीठाला मागे टाकण्याचा वेग औरंगाबादने घेतला आहे.

दिल्लीत महाराष्ट्रयीन वकिलांकडून येणारे सर्वाधिक काम आपल्याकडे असल्यामुळेच आपण खंडपीठाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो आहेत, असे स्पष्ट करून न्यायमूर्ती ललित यांनी अनेक मिश्किल किस्से यावेळी सांगितले. ते म्हणाले, वकिलांचे तरुणपण आणि पैलवानांचा वृद्धत्वाचा काळ मोठा कठीण मानला जातो. आपल्या पांढऱ्या केसांवरून हात फिरवताना येथील एका न्यायाधीशांनी, हे खरे आहेत का, अशी विचारणा केली होती. कधी-कधी लवकर पांढरे केस वकिलांचे होत असतील तर त्याकडे सकारात्मकतेने पाहावे. कारण पांढरे केस अनुभवाचे निदर्शक मानले जाते, असे सांगताच मोठा हशा पिकला. औरंगाबादच्या विधिज्ञांकडे अनेक गुण असून त्यात सर्वाधिक ही तरुण मंडळी आहेत, असेही ते म्हणाले.

न्या. बोर्डे यांनी वाढत असलेल्या याचिकांबाबतची कारण मीमांसा केली. केवळ एका शब्दातील फरकासाठी याचिका दाखल होत असल्याकडे लक्ष वेधले. पूर्वी कार्यरत न्यायाधीश व आताचे, यासह न्यायालयीन प्रक्रियेसंदर्भातील इमारत बांधकाम आदींबाबत कामे, याची माहिती त्यांनी दिली. प्रास्ताविक अ‍ॅड. शहा यांनी केले. इतर मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.