औरंगाबादमधील ‘संविधान बचाव परिषदेच’ आयोजन हे ठरवलेल्या वेळेत आणि नियोजित ठिकाणीच होणार आहे. संत तुकाराम नाट्यमंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमाला महापालिकेतील सत्ताधारी खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र शुक्रवारी आयुक्त मुगळीकर यांनी नियोजित सभागृह देण्याचे तोंडी आदेश दिल्यामुळे हा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वाद  मिटला आहे. कन्हैया कुमार सहभागी होणारा कार्यक्रम ७ऑगस्टला पार पडणार आहे.

औरंगाबादमध्ये डाव्या आणि आंबेडकर चळवळीतील अठरा संघटनांनी एकत्र येत ‘संविधान बचाव परिषदेच’ आयोजन केलं आहे. या कार्यक्रमासाठी दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार येणार आहे. मात्र पालिकेने एनवेळी कार्यक्रमासाठीच सभागृह नाकारले. त्यानंतर विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. विद्यार्थी संघटनांच्या आक्रमक भूमिकेपुढं पालिका प्रशासनाला नमतं घ्यावे लागले. आयुक्त मुगळीकर यांनी सभागृह देण्याचे तोंडी आदेश दिले. त्यामुळे नियोजित ठिकाणीच कन्हैया कुमारचा कार्यक्रम होणार हे स्पष्ट झाले.

संविधान बचाव युवा परिषदेच्या वतीने आयोजित विद्यार्थी नेता कन्हैया कुमारच्या भाषणासाठी संत तुकाराम नाटयगृहात कार्यक्रम करण्यास दिलेली परवानगी महापालिकेने बुधवारी अचानक रद्द केली होती. नाटयगृह दुरुस्तीचे कारण पुढे करून दिलेली परवानी काढून घेण्याच्या निर्णयाचा विद्यार्थी संघटनेने जोरदार निषेध केला. संत तुकाराम नाटयमंदिरातील कार्यक्रमासाठी आयोजकांनी तब्बल ५४ हजार २४० रुपयांचे शुल्क महापालिकेमध्ये जमा केले होते. रक्कम भरल्यानंतर त्याच दिवशी कार्यक्रम घेण्यास महापालिकेच्या वतीने परवानगीचे पत्र देण्यात आले. मात्र, बुधवारी रात्री संत तुकाराम नाट्यमंदिर दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने संत एकनाथ नाट्यगृहात कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात येत आहे, असे पत्र देण्यात आले होते.