दिवसाआड सरासरी अठराशे कपडय़ांची धुलाई

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिवसाआड १ हजार ८०० ते २ हजार कपडे धुतले जातात. या विभागात तशी मोठी यंत्रे असली तरी मनुष्यबळ आहे केवळ १२ कर्मचारी. या विभागात तब्बल २६ कर्मचारी होते. सेवानिवृत्तीमुळे कर्मचारी कमी झाले. आता दोन हजार कपडे दररोज धुणे आणि वाळविणे हे काम दिवसेंदिवस जिकिरीचे होऊ लागल्याने कपडे धुण्यासाठी निविदा काढल्या होत्या. त्याचा दर होता २५ पैसे आणि ५० पैसे. परिणामी कोणी निविदा भरण्यासाठी आलेच नाही. त्यामुळे घाटीची स्वच्छता अपुऱ्या मनुष्यबळातच सुरू आहे.

वैद्यकीय शिक्षणास मिळणाऱ्या एकूण निधीमध्येच राज्य सरकार काटकसर करते. परिणामी औषधे पुरेशी नसतातच. शिवाय अन्य विभागातही अपुरे मनुष्यबळ आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या तर खूपच कमी असल्याने स्ट्रेचर ढकलण्याचे कामही रुग्णांच्या नातेवाइकांनाच करावे लागते. कर्मचारी कमी असल्याने खाटांवरील चादर (बेडशिट) उशांच्या खोळी, खिडक्यांचे पडदे, शस्त्रक्रिया विभागातील कपडे धुण्यासाठी चार यंत्रे आहेत. कपडे वाळविण्यासाठीही दोन यंत्र आहेत. मात्र, त्यात कपडे पुरेसे वाळत नाहीत.  प्रत्येक धुतलेल्या कपडय़ाची स्वतंत्रपणे नोंदही ठेवली जाते. या कामासाठी केवळ १२ कर्मचारी आहेत. काही दिवसापूर्वी अपुरे कर्मचारी असल्याने स्वतंत्र निविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. तथापि या निविदेतील दर कमालीचे कमी असल्याने बहुतेकांनी त्या निविदेकडे पाठ फिरविली. महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बाहय़रुग्ण तपासणी तुलनेने कमी असल्याने घाटी रुग्णालयातील डॉक्टरांवर तर नेहमीच ताण असतो. तेथील कर्मचाऱ्यांवरही मोठा असल्याचे दिसून येत आहे. अगदी कपडे धुणाऱ्यापासून ते शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांपर्यंत हा ताण दिसून येतो.