महाराष्ट्र बँकेची थकीत कर्जाची व्याप्ती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. २०१३मध्ये बँकेचे थकीत कर्ज २ हजार ४५० कोटी रुपये होते, ते सप्टेंबरअखेर थेट ७ हजार ९८६ कोटी रुपयांवर गेले आहे. थकीत कर्जामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांनाही चिंता वाटत असल्याने ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने ७ फेब्रुवारीपासून थकीत कर्जवसुली पंधरवडा सुरू झाला. संघटनेने वसुली अभियान हाती घेतल्यामुळे वसुली चांगल्या प्रमाणात होईल, असा दावा केला जात आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वसामान्य माणूस घाम गाळून आणलेला पैसा ठेवत असतो. त्यांनी केलेल्या बचतीचे विश्वस्त म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बँका काम करीत असतात. या बचतीचे रक्षण करणे हे कर्मचाऱ्यांचेही काम असल्याने ही मोहीम यशस्वी करण्याचे ठरविले आहे. आपापल्या विभागातील १० मोठय़ा कर्जदारांना भेटून कर्मचारी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत वसुलीसाठी प्रयत्न करतील. कर्ज असेच वाढत गेल्यास बँकेचे अस्तित्व धोक्यात येईल व ही कर्जे बुडीत म्हणून जाहीर केली तर सरकारला अर्थसंकल्पात तरतूद करून बँकांना भांडवल उपलब्ध करून द्यावे लागेल. ज्याद्वारे सर्वसामान्य माणसास पुन्हा अधिक कर द्यावा लागेल आणि जनतेच्या पैशातूनच तो तोटा भरून काढावा लागेल, म्हणूनच संघटनेने जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरावा यासाठी वसुली अभियान सुरू केल्याची माहिती एआयबीईएचे सचिव देवीदास तुळजापूरकर यांनी दिली.