श्रेयासाठी बबनराव लोणीकर अग्रेसर; विभागीय आयुक्तालयात रंगरंगोटी

मराठवाडय़ाच्या विकासप्रश्नी औरंगाबाद येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच कोणते निर्णय होतील, हे सांगत ‘घोषणांची लांबलचक यादीच’ पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी जाहीर करून टाकली. पत्रकार बैठक घेऊन १५ हजार कोटींच्या वॉटर ग्रीडसह ‘सीड हब’ तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या नवोपक्रमाची माहिती त्यांनी दिली. हे सर्व निर्णय मंत्रिमंडळात मंजूर होणारच आहते, असे त्यांनी ठासून सांगितले. दरम्यान, मंत्रिमंडळ येणार म्हणून अधिकाऱ्यांनी कार्यालयांची रंगरंगोटी हाती घेतली आहे. दालनेही सजविली जात आहेत.  अगदी विश्रामगृहातील फर्निचरदेखील बदलले जात आहे.

आठ वर्षांपूर्वी झालेली मंत्रिमंडळाची बैठक पुन्हा एकदा घेण्याची तारीख जाहीर झाली आणि प्रशासनाने लगबगीने कामाला प्रारंभ केला. मंत्री येणार म्हणून आयुक्तालय चकाचक करण्याची सूचना पुढे आली. जुन्या भिंतींना नव्याने रंग देण्याचे ठरविण्यात आले. गुरुवारपासून कामाला प्रारंभ झाला. विश्रामगृहातील कोच बदलण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीआधीच त्यांनी जालना जिल्हय़ाच्या वाटय़ाला तसेच मराठवाडय़ाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली.

हे सर्व सुरू असताना विभागीय आयुक्तालयात रंगरंगोटी सुरू होती. एवढेच नाही तर विभागीय आयुक्तालयाच्या पायऱ्याही आज उखडण्यात आल्या.  विभागीय आयुक्तालयाच्या पायऱ्या निसरडय़ा. मंत्रिमंडळ बैठकीच्या पाश्र्वभूमीवर आयुक्तालयाच्या पायऱ्या बदलण्याचा घाट घातला गेला.  दोन-तीन दिवसांत आयुक्तालयाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा चंग अधिकाऱ्यांनी बांधला आहे. मंत्रिमंडळाच्या ताफ्यांसाठी १३ जिल्ह्य़ांतून २७६ गाडय़ा मागविण्यात आल्या असून त्यात ‘डीव्ही’ कारचाही समावेश आहे. इतर तयारीसाठी १६ समित्यांचे गठन करण्यात आले आहे.

  • १५ हजार कोटी रुपयांची वॉटर ग्रीड, ११० कोटी रुपयांचे ‘सीड हब’, मंठा येथील सुरक्षा बलातील जवानांसाठी ११० कोटी रुपयांची निवासस्थाने,सिडकोचा नवा कार्यक्रम
  • सांडपाणी व्यवस्थापनाचे २५ ठिकाणी करावयाचे प्रयोग यांची इत्थंभूत माहिती त्यांनी दिली.