गेवराईच्या प्रत्येक फॅब्रिकेशनच्या दुकानात सध्या लोखंडाच्या मोठय़ा शिट्स पडलेल्या. दोन दिवसाला एक असा टँकर उभारणीचा वेग आहे. ३८ रुपये किलो दराने मिळणाऱ्या लोखंडी पत्र्याची उलाढाल कोटय़वधी रुपयांवर गेली आहे. मराठवाडय़ात सध्या १ हजार ११८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या काळात हा आकडा अडीच हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. परिणामी टँकर बाजाराला तेजी आली आहे.
बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्हय़ांत पाणीटंचाईची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. येत्या काही दिवसांत संपूर्ण लातूर शहर टँकरवर येईल. त्यामुळे टँकर उभारणीच्या कामाला वेग आला आहे. साडेसहा हजार, १० हजार आणि १२ हजार लीटर क्षमतेचे टँकर उभे करण्यासाठी किती किलो लोखंड लागते याची गणिते आता फॅब्रिकेशनवाल्यांना पाठ झाली आहेत. गेवराई शहरात रात्री थंडीत टँकर झाळणारा न्यू भारत फॅब्रिकेशनचा मालक मुजफ्फर पटेल सांगत होता, ‘साहब अभी धंदे का टाईम है. इसी साल से टँकर बनाना शुरू किया है.’
साडेसहा हजार लिटरचा टँकर बनवायचा असेल तर साडेपाच क्विंटल लोखंड लागते. लोखंडाचा दर बीड येथे प्रतिकिलो ३८ रुपये आहे, वाहतूक खर्च वेगळाच. म्हणजे २० हजार ९०० रुपयांचे लोखंड. टँकर बनविण्यास साधारण १४ पुडे झाळण्याचे रॉड लागतात. एक पुडय़ाची किंमत १७० रुपये. मजुरी सात हजार रुपये. या कामासाठी अधिक वीज लागते आणि त्यामुळे काही वेळा टँकर बनविण्याचा वेग कमी होतो. वीज कपातीमुळे काम थांबते, तरीही एक टँकर बनवायचा तर किमान १०० युनिट वीज जळतेच. आता टँकर बनविण्याचे काम रात्री-बेरात्री सुरू झाले आहे. सर्वच जिल्ह्य़ांत या धंद्याला बरकत आहे.
सर्वात कमी पाऊस नोंदवल्या गेलेल्या मादळमोही येथील पवार नावाचा फेब्रिकेशन करणारा तरुण सांगत होता, आता अवजारे करण्याचे काम थांबलेच आहे. शेती अवजारे कशाला लागतील? त्यामुळे टँकर बनवतो आहे. एक टँकर बनविला तर ८० हजार रुपयांचा धंदा होतो. अधिक क्षमतेचा टँकर अधिक पैसा. १२ हजार क्षमतेचे टँकर ठेकेदार घेतात. दहा हजार क्षमतेचा टँकर बागायतदार शेतकरी घेत आहेत आणि पाणी विकण्याचा धंदा करणारे छोटे टँकर बनवून घेत आहेत. त्यामुळे मराठवाडय़ात फेब्रिकेशनच्या धंद्याला तेजी आहे. एका लोखंडाच्या व्यापाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आता धंदा तेजीत आहे. लोखंडी शीट अधिक विकल्या जात आहेत. त्याची उलाढाल कोटय़वधीत आहे.