पालिकेच्या आखाडय़ात कार्यकर्त्यांची ‘उलथापालथ’; घाऊक पक्षांतरे

पालिका निवडणुकीत सत्ता उलथवून टाकण्याच्या ‘राणा भीमदेवी’ घोषणा करणाऱ्या नेत्यांचे प्रमुख कार्यकत्रे ऐन लढाईच्या वेळीच स्वगृही परत येऊ लागल्याने काही नेत्यांवर आता काय करायचे, अशी परिस्थिती आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या आखाडय़ात कार्यकर्त्यांच्या ‘घरवापसी’ने राजकीय वातावरण तापले आहे. काही धूर्त नेत्यांनी विरोधी पक्षात पाठवलेले कार्यकत्रे ऐन लढाईच्या मदानातच ‘परत’ फिरल्याने अनेक नेत्यांवर हतबल होण्याची नामुष्की ओढवली आहे. परळीत बहीण-भावाच्या तर गेवराई, बीडमध्ये काका-पुतण्याच्या नात्यागोत्यातील संघर्षांत कार्यकर्त्यांची उलथापालथ वेगाने होत असल्याने राजकीय पक्षांचे अस्तित्व नेत्यांच्या गटात विरघळल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

बीड जिल्ह्य़ातील सहा नगरपालिका निवडणुकीचा आखाडा तापू लागल्याने कार्यकर्त्यांची उलथापालथ सुरू झाली आहे. पालिका निवडणुकीत सत्ता उलथवून टाकण्याच्या ‘राणा भीमदेवी’ घोषणा करणाऱ्या नेत्यांचे प्रमुख कार्यकत्रे ऐन लढाईच्या वेळीच स्वगृही परत येऊ लागल्याने काही नेत्यांवर आता काय करायचे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षांतरापेक्षाही नेत्यांचे गट बदलण्याचे सोहळे मोठे होऊ लागल्याने नेत्यांच्या गटात राजकीय पक्षांचे अस्तित्व विरघळल्याचे चित्र दिसत आहे. बीड नगरपालिकेच्या कुरुक्षेत्रावर राष्ट्रवादीचे क्षीरसागर काका-पुतण्याने एकमेकांविरुद्ध शड्ड ठोकल्याने राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची दोन गटांत विभागणी झाली आहे. काका डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि पुतणे संदीप क्षीरसागर यांनी स्वतंत्र उमेदवारांच्या मुलाखती आणि निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. वर्षांनुवष्रे काकाबरोबर दिसणारे कार्यकत्रे पक्ष बदलल्यासारखे पुतण्याबरोबर वावरू लागले आहेत.

३० वर्षांची क्षीरसागरांची सत्ता उलथवून टाकण्याची घोषणा करणारे आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राममध्ये दोन वर्षांत दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांची घरवापसी झाली. सुरुवातीला मोईन मास्टर, शेख निजाम यांनी एमआयएममध्ये प्रवेश केल्यानंतर काहीच दिवसांत मोईन मास्टर पुन्हा राष्ट्रवादीत दाखल झाले. सुभाष सपकाळ, राजेश घुंगरड या प्रमुखांनीही राष्ट्रवादीची वाट धरली. परळीत मुंडे बहीणभावातील कार्यकर्त्यांमध्येही पक्षांतराने गती घेतली आहे.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे यांच्या पाठोपाठ शंकर आडेपवार यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. पंकजा मुंडे यांनीही राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना गळाला लावत राष्ट्रवादीला पक्षांतराचा धक्का दिला. दुसरीकडे गेवराईत राष्ट्रवादीचे माजी मंत्री बदामराव पंडित आणि पुतणे आमदार अमरसिंह पंडित, तर मेहुणे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्येही अदलाबदल सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमरसिंह पंडित समर्थक दादासाहेब घोडके, बाळासाहेब सानप, राहुल खंडागळे या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. तर गल्लोगल्ली काका-पुतण्याच्या कार्यकर्त्यांत गट स्थलांतराचे सोहळे रंगू लागले आहेत.