दीपावलीनिमित्त गावाकडे जाणारी प्रवासी खासगी काळयापिवळ्या जीपमध्ये खचाखच भरलेले. बसस्थानक मात्र सुनसान. काही अधिकारी एका दालनात बसून संपाची चर्चा करणारे. वाहक आणि चालकांनी संप म्हणून एक जागा पकडलेली. खासगी बस तिकीट विक्रेत्याकडे लांबच लांब रांग. राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्थाच कोलमडलेली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी पर्यायी व्यवस्थेसाठी बैठकांवर बैठका सुरू होत्या. तिसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल कायम होते.     दरम्यान, जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या  सुमारे २५० विदेशी पर्यटकांना शहराकडे परतता आले नाही. त्यातील काही जणांना शहरात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. मात्र, अजूनही पूर्ण समस्या सुटू शकली नाही, आम्ही बोलणी करत आहोत, असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले.

औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकावर आज १३० गाडय़ा उभ्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा, इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठीच्या बसना प्रवासी वाहतूक करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली. विभागीय नियंत्रकांना अशा वाहनांची यादी पुरविण्याचे निर्देश प्रादेशिक परिवहन विभागाला जिल्हाधिकाऱ्यांना दिले. वाहक व चालकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. होमगार्डमधील काही वाहनचालकांनाही बस चालविण्याची परवानगी देता येईल का, याबाबतही प्रशासनामध्ये चर्चा सुरू आहे. चालकाला प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना असल्याशिवाय असे करता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. खासगी वाहनाने प्रवासी येत असल्याने अपघातही होऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील चाकण येथून निघालेल्या एका मालमोटारीस झालेल्या अपघातामध्ये गुरुवारी पहाटे दोघांचा जणांचा मृत्यू झाला आहे.