केंद्राकडून पॅकेजची अपेक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत उद्या (शनिवारी) होणाऱ्या बठकीत विदर्भ-मराठवाडय़ातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्णाांतील रखडलेल्या पाटबंधारे प्रकल्पांना अर्थसाहाय्य देण्याचा विषय आहे. केंद्राकडून सुमारे १० हजार कोटींचे पॅकेज मिळण्याची अपेक्षा असून, मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्णाांच्या पदरात भरीव दान पडणार काय, याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधानांसमवेत होणाऱ्या बठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व संबंधित अधिकारी उद्या दिल्लीस जात आहेत. राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्णाांमधील रखडलेले सिंचन प्रकल्प व उपाययोजना यांचा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व उमा भारती यांनी गेल्या आठवडय़ात आढावा घेतला. पंतप्रधानांच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेतून भरघोस मदत करण्याचे सूतोवाच मुंबईत केले होते. उद्या होणाऱ्या बठकीच्या अनुषंगाने मंत्रालयात शुक्रवारी सकाळपासून अधिकाऱ्यांची लगबग सुरू होती. पंतप्रधानांच्या योजनेतून मराठवाडय़ातील रखडलेल्या प्रकल्पांना आवश्यक तितका निधी मिळण्याच्या विषयात भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवेही लक्ष ठेवून होते.