राज्य सरकारची धावाधाव; १० लाख पोत्यांची मार्केटिंग फेडरेशनकडून मागणी

तूर खरेदीसाठी कोणी बारदान देता का.., असे म्हणण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. मार्केटिंग फेडरेशनने राज्यात तूर खरेदीसाठी १० लाख पोत्यांची मागणी नाफेडकडे केली आहे. तुरीचे उत्पादन आणि खरेदी याचा अंदाज चुकल्याने बारदानांची शोधाशोध सुरू झाली. या अनुषंगाने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुंबई येथे पोत्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी बैठक घेतली. हा प्रश्न सोडविण्यासाठी २६ लाख पोत्यांची आवश्यकता आहे. ५० किलो वजनासाठी गोणी मिळाव्यात, अशी मागणी प्रत्येक जिल्हय़ातून होत आहे. बारदान नसल्याने तूर खरेदीअभावी पडून आहे. शेतकरी हैराण आहे.

मार्केटींग फेडरेशनमधील सूत्रांच्या मते, दोन ट्रक गोणी मराठवाडय़ात पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, त्या वितरित होऊन तूर खरेदीची प्रक्रिया सुरू होण्यास आणखी आठ दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. आतापर्यंत मार्केटिंग फेडरेशनने नाफेडमार्फत ८१ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तर भारतीय खाद्य निगम मार्फत ८९ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. ‘तुमच्याकडे बारदाना नाही तर आम्ही आणतो. पण तूर तरी खरेदी करा.’ अशी कळकळीची विनंती अनेक ठिकाणी शेतकरी अधिकाऱ्यांना करीत आहेत. मराठवाडय़ातील बहुतांश जिल्हय़ातून तूर खरेदी बंद झाली आहे. खूप ओरड होत असल्याने राज्य सरकारने आता बारदानाची शोधाशोध सुरू केली आहे. १० लाख पोत्यांची ही मागणी तातडीने पूर्ण करण्यासाठी सुरू असणारी धावपळ पहिल्यांदाच करावी लागत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्यातरी तुरीचे भवितव्य बारदानातच अडकले असल्यामुळे राज्य सरकारने १० लाख पोत्यांची मागणी तर केली आहे. ती सुटेपर्यंत तूर उत्पादक शेतकऱ्यांना बाजारसमितीच्या आवारातच मुक्काम करावा लागणार आहे.