मराठवाडय़ातील अनेक अल्पवयीन मुली विवाहबंधनात

मराठवाडय़ात सध्या ऊसतोड मजूर लेकींचा सांभाळ कसा करायचा, या विवंचनेतून आपल्या वयात आलेल्या कोवळ्या कळ्यांना लग्नाच्या बेडीत अडकवत आहेत.

राज्याच्या महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्य़ातील शिरूर तालुक्यात ५३ बालविवाह होणार असल्याच्या विषयाकडे ‘इंडियन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेच बालविवाहाचा विषय गंभीरतेने घेतला आणि ते रोखण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. शुक्रवारी व शनिवारी होणारे दोन बालविवाह रोखण्यात सध्या तरी यश आले आहे.

ऊसतोड मजुरांच्या स्थलांतराचा दरवर्षीचा प्रश्न पाहून त्यांच्या मुलांसाठी बीड जिल्ह्य़ात हंगामी वसतिगृहांची उभारणी केली जाते. गतवर्षी जवळपास ४५० वसतिगृहात ४४ हजार मुलांना प्रवेश देण्यात आला होता. वसतिगृहात मुलींना ठेवण्याबाबत ऊसतोड मजुरांना असुरक्षित वाटत असल्याने आणि गावात सांभाळणारे कुटुंब सदस्य नसल्यामुळे कोवळ्या मुलींचे लग्न उरकणे, हाच एकमेव पर्याय त्यांच्याकडे असतो. यावर्षी ५३ बालविवाह होणार असल्याच्या संदर्भातील वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये ५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाले. त्या वृत्ताची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन बीड जिल्हा न्यायालयाला होणारे बालविवाह रोखण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

जिल्हा न्यायालयाने शिरूर न्यायालयाला सूचित केल्यानंतर शनिवारी न्या. अनिल कुलकर्णी, लेक लाडकी अभियानच्या अ‍ॅड. वर्षां देशपांडे, शिरूरचे तहसीलदार आबासाहेब चौरे, बालविकास प्रकल्प अधिकारी एस. के. बांगर, पोलीस निरीक्षक एस. डी. दराडे यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली.

शनिवारी व रविवारी होणारे असे दोन बालविवाह रोखण्यात यश आले असून, येत्या काही दिवसांत शिरूर तालुक्यात ७३ बालविवाह होणार असल्याची माहिती आमच्याकडे आहे, असे अ‍ॅड. वर्षां देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. तर बालविवाह रोखण्याचे नियोजन सुरू असल्याचे शिरुरचे तहसीलदार आबासाहेब चौरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.

पंकजा मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत

शिरूर तालुक्यातील बालविवाहाच्या संदर्भाने बीडच्या पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर आयोजित चहा-पानाच्या कार्यक्रमात व त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत असल्याचे त्यांच्या स्वीय सहायकांकडून सांगण्यात आल्याने पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.