पक्षापासून फटकून वागणारे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव शनिवारी ग्रामपंचयात निवडणुकीमध्ये यशस्वी झालेल्या सरपंचांच्या सत्काराला आवर्जून उपस्थित राहिले. मतभेद असणाऱ्या खासदार चंद्रकांत खरे यांच्या समवेत एका व्यासपीठावर बसले. ‘आम्ही कितीही भांडलो तरी पक्षप्रमुखांचा आदेश आल्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र येतो,’ असेही सांगायला ते विसरले नाहीत. त्यामुळे कन्नडमधील शिवसेनेच्या वादावर काही काळ तरी पडदा पडला असल्याचे दिसून येते आहे. सेनेच्या वतीने आज निवडून आलेल्या ९६ सरपंचांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात शंभराहून अधिक सरपंच शिवसेनेचे निवडून आल्याचा दावा या वेळी करण्यात आला.

खासदार चंद्रकांत खरे आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातील मतभेद टोकाला गेले होते. अगदी खासदार खरे यांच्या निधीमध्ये कसे घोळ आहेत, याची तक्रारही आमदार जाधव यांनी केली होती. या पाश्र्वभूमीवर जाधव यांनी प्रस्तावित केलेल्या कागदपत्रांची जमवाजमव खरे समर्थकांनी केली होती. पक्षात राहून हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सेनेच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरविले होते. सेनेच्या जिल्हा नेतृत्वावर टीका करणारे हर्षवर्धन जाधव सेनेत केवळ तांत्रिक कारणासाठी असल्याचे दिसून येत होते. त्यांनी कन्नड मतदारसंघात काही कार्यक्रम काँग्रेस नेत्याबरोबरही घडवून आणले होते. त्यामुळे शिवसेनेमध्ये ते असून नसल्यासारखे होते. स्वत:चा मतदारसंघ बांधताना त्याला सेनेचे चिन्ह लागू नये, अशी तजवीज त्यांनी केली होती. मात्र, गेल्या महिन्यात हर्षवर्धन जाधव यांना शिवसेनेतील वरिष्ठांचा दूरध्वनी गेला. राज्याच्या राजकारणामध्ये आपल्यापासून आमदार फुटू नयेत म्हणून सर्व नाराजांना ‘मातोश्री’वर बोलावून घेऊन त्यांची समजूत काढण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच हर्षवर्धन जाधव यांनी जिल्ह्यातील कार्यक्रमास हजेरी लावली. आमच्यामध्ये मतभेद होते. मात्र, आता पुन्हा आपण सेनेचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार खरे यांनीही आता ‘दुसरीकडे सत्काराला जाऊ नका, आम्हीच तुमचे सत्कार करू,’ असे सांगत मतभेदावर पडदा पडल्याचे जाहीर सांगितले.

मतभेद नसल्याचे हे चित्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकते की नाही, यावर प्रश्नचिन्ह लावले जात आहेत. हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे उदयसिंह राजपूत यांना शिवसेनेमध्ये प्रवेश देण्याच्या हालचाली मध्यंतरी सुरू होत्या. त्याला आता तूर्त पूर्णविराम मिळाला आहे. सरपंचाच्या सत्कार कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या उपस्थितीमुळे संघटनेच्या बांधणीमध्ये हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे.