केंद्र सरकारच्या संसद आदर्शग्राम योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनेही आमदार आदर्शग्राम योजना सुरू करण्याची घोषणा केली खरी;  मात्र दोन वेळा या योजनेच्या नावासाठीच सुधारित आदेश काढण्यात आल्यानंतर ४ महिने लोटले, तरी गाव विकसित करण्याबाबत मार्गदर्शक सूचनाच स्पष्ट नसल्याने ही योजना आमदारांनी केवळ गावांची नावे सुचविण्यापर्यंतच गेल्याचे चित्र आहे.
एका आमदाराने मतदारसंघातील ३ गावांची निवड करून विकास योजना राबवाव्यात, असे धोरण असल्याने पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजपच्या सर्व आमदारांनी गावे निवडली असली, तरी विधान परिषदेचे आमदार धनंजय मुंडे व विनायक मेटे यांनी गावांची नावे सुचविली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आमदारांनी गावे निवडली असली, तरी ग्रामविकास विभागाकडून आदर्श गावाबाबतचे स्पष्ट आदेश नसल्याने ही योजना सध्या तरी लालफितीतच अडकली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांसाठी संसद आदर्शग्राम योजना सुरू केली. प्रत्येक खासदाराने मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन सरकारच्या सर्व योजना राबवून हे गाव आदर्श करण्याचे यात अभिप्रेत आहे. त्यानुसार भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पोहनेर (तालुका परळी), तर काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांनी लहुरी (तालुका केज) ही गावे निवडली आहेत. खासदारांनी निवडलेल्या गावांमध्ये सरकारी योजनांची अंमलबजावणी सुरूही झाली. केंद्राच्या धर्तीवरच राज्य सरकारनेही प्रत्येक आमदाराने ३ गावे निवडून आदर्श करण्याची घोषणा केली. मात्र, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी सुरुवातीला काढलेल्या आदेशात योजनेच्या नावात बदल करून मेमध्ये आमदार आदर्शग्राम योजना, अशी सुधारणा केली. मात्र, गावात विकासकामे कशा पद्धतीने राबवायची, या बाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना अजूनही निघाल्या नाहीत.
ग्रामविकास मंत्रालयाकडून आमदार आदर्श ग्रामयोजनेबाबत स्पष्ट सूचनाच नसल्यामुळे सरकारकडून घोषित ही योजना मार्गदर्शक सूचनांच्या प्रतीक्षेत अडकली आहे. सरकारने घोषणा केल्यानंतर पालकमंत्री मुंडे यांनी सेलू, धसवाडी (तालुका परळी), आमदार आर. टी. देशमुख यांनी कुंडी (तालुका धारूर), धनगरवाडी (तालुका माजलगाव) व रुईिपपळा (तालुका वडवणी), आमदार संगीता ठोंबरे यांनी बनकारंजा, डोईफोडवाडी, केकानवाडी (तालुका केज), आमदार भीमराव धोंडे यांनी पाटसरा (आष्टी), तांबा राजुरी (पाटोदा) व  राळेसांगवी (शिरूरकासार), तर लक्ष्मण पवार यांनी पांढरवाडी, वडगाव ढोक, बंगालीिपपळा (गेवराई), विधान परिषदेचे सदस्य अमरसिंह पंडित यांनी किनगाव, खडकी, अर्धमसला (गेवराई) या गावांची नावे सुचविली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी मात्र गावांची नावे प्रशासनाला कळवली नाहीत. योजनेची घोषणा होऊन ४ महिने लोटले, तरी ग्रामविकास विभागाकडून योजना राबविण्याबाबत स्पष्ट सूचनाच नसल्याने योजना लालफितीत अडकून पडली आहे.