आमदार आरेफ नसीम खान यांचा दावा

काँग्रेसचे सरकार असताना अल्पसंख्याक समाजासाठी विविध कल्याणकारी योजना तयार करण्यात आल्या होत्या. तसेच मौलाना आझाद आíथक विकास महामंडळाची स्थापना केली होती, त्याचे काम ठप्प आहे. भाजप सरकारने सर्व योजना बंद पाडल्या असून, हे सरकार अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार आरेफ नसीम खान यांनी केला.

काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार आरेफ नसीम खान यांनी हिंगोली येथील केमिस्ट भवन येथे गुरुवारी अल्पसंख्याक समाजाचा मेळावा घेतला. आमदार डॉ. संतोष टारफे, अल्पसंख्याक समितीचे सदस्य गफार मास्टर, वसमतचे माजी नगराध्यक्ष हाफीज फारुकी आदींची उपस्थिती होती.

काँग्रेस सरकारने अल्पसंख्याक व मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यातील काही त्रुटींमुळे मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही, पण मुस्लीम समाजाचे शैक्षणिक आरक्षण न्यायालयाने कायम ठेवले होते, परंतु भाजप सरकार मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याबाबत गंभीर नाही. सब का साथ सब का विकास, अशी घोषणाबाजी करणाऱ्या सरकारने दिलेल्या आश्वासनाची अद्याप तरी पूर्तता केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मराठा समाज आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यात लाखोंचे मोठमोठे मोच्रे काढत आहेत. आरक्षणाची त्यांची मागणी रास्त आहे. याची वेळीच सरकारने दखल घ्यावी, नसता आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा व मुस्लीम समाजाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाच्या मूक मोर्चासंबंधी ‘सामना’मध्ये छापण्यात आलेले व्यंगचित्र हे मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे कृत्य शिवसेनेने केले असून, हा प्रकार निंदनीय असल्याचे ते म्हणाले.