शिक्षण कमी असले तरी पक्षावर अढळ निष्ठा असल्याने मोहन मेघावाले यांना शिवसेनेतर्फे महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची उमेदवारी देण्यात आली. पालकमंत्री रामदास कदम यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा सोमवारी पत्रकार बैठकीत केली. ही निवड सर्वासाठी आनंदाची बाब असल्याचे कदम यांनी सांगितले. त्यांचा रोख खासदार चंद्रकांत खरे यांच्याकडे होता. त्यांनाही हा निर्णय मान्य असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. मेघावाले सलग ४ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले, तसेच ते स्थायी समितीचे सदस्यही होते.

महापालिकेतील स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक २ जूनला होणार आहे. १ जूनपर्यंत अर्ज दाखल करावा लागणार असल्याने या पदासाठी कोणाचे नाव येईल, यावरून बरेच तर्कवितर्क सुरू होते. मकरंद कुलकर्णी यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेघावाले यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित केल्याचे सांगण्यात आले. तसे पत्र पालकमंत्र्यांनी महापौर त्र्यंबक तुपे यांच्याकडे दिले.

या वेळी संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, सहसंपर्क प्रमुख अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.