नवीन इमारतीचा ५ कोटींचा प्रस्ताव मंजूर पण..

वर्षांकाठी साडेतीन हजार मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात येणाऱ्या घाटीतील शवागृहाची अवस्था अत्यंत जुनाट आहे. या शवागृहाला अर्धशतक होत आलेले असल्याने ते वैद्यकीय परिषदेच्या कुठल्याही मापदंडात बसणारेही नाही. उदाहरणार्थ येथे शीतगृहही नसल्यामुळे बेवारस मृतदेहांना एका वातानुकूलित खोलीत उघडय़ावरच ठेवावे लागत आहेत. नवीन इमारतीचा ५ कोटींचा प्रस्ताव चार महिन्यांपूर्वीच मंजूर झालेला असला तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.

घाटीत मराठवाडाच नाही तर पश्चिम विदर्भातील बुलडाणासारख्या जिल्ह्य़ातून, खान्देशच्या जळगाव आदी भागातून व अहमदनगरसारख्या जिल्ह्य़ातूनही रुग्ण दाखल होतात. यातील काही विष प्राशन केलेले रुग्ण, खून, अपघातात मृत्यू पावलेल्यांची उत्तरीय तपासणी घाटीतील शवागृहात केली जाते. वर्षांकाठी सुमारे साडेतीन हजार मृतदेहांची उत्तरीय तपासणी येथे होते. काही मृतांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी माणसे घेऊन येतो म्हणून जातात, ते पुन्हा फिरकत नाहीत. अशा बेवारस मृतदेहांनाही अखेर शवागृहातच ठेवावे लागते. मात्र, त्यासाठी आवश्यक जागा, यंत्रणा मात्र येथे नाही.

वैद्यकीय क्षेत्र आधुनिकतेची कास धरून नवनवीन यंत्रणांचा आधार घेत मार्गक्रमण करीत असताना घाटीतील शवागृह मात्र ४० ते ५० वर्षांपूर्वीच्या स्थितीत आजही सुरू आहे. चार ते पाच खोल्या, त्यात शीतगृह नाही. केवळ एक-दोन खोलीतच वातानुकूलित यंत्र बसवलेले आहेत. त्यातील एका खोलीत बेवारस मृतदेह एका स्ट्रेचरवर ठेवलेले असतात. खरं तर त्यासाठी शीतगृह आवश्यक आहे. पण ते घाटीत नाही. त्यामुळे त्यांना एका खोलीत पण उघडय़ा अवस्थेतच ठेवावे लागते.

शवागृहात आवश्यक मनुष्यबळ असले तरी इतर यंत्रणांची मात्र वानवा आहे. शवागृह कसे असावे, याचे काही मापदंड वैद्यकीय परिषदेने घालून दिलेले आहेत. त्यात सध्याचे शवागृह बसत नाही. शीतगृहे, ऐसपैस परिसर, सभोवताली बगिचा, एखादे सभागृह, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक यंत्रणाही येथे गरजेची आहे. असे शवागृह गोव्यामध्ये आहेत. त्या धर्तीवर शवागृह उभारण्यात यावे, यासाठी एका संस्थेकडून जनहित याचिकाही दाखल करण्यात आलेली होती. त्यानुसार ५ कोटींचा प्रस्ताव तयार केलेला आहे. त्याला मंजुरीही मिळाली आहे. मात्र, अद्याप काम झालेले नाही.

वेगळे काम, वातावरणातही वेगळेपण

शवागृहातील कर्मचाऱ्यांनी कामकाज इतर विभागापेक्षा वेगळे ठेवलेले आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन केले जात असल्यामुळे आणि नंतरची दरुगधी, त्यानंतरची मानसिक अवस्था आणि घरी गेल्यानंतर कुटुंबीयांच्या भावना, अशी परिस्थिती दररोजच कर्मचाऱ्यांच्या वाटेला येते. त्यासाठी सात कर्मचाऱ्यांनी एक विशिष्ट पद्धत सामंजस्याने लावून घेतलेली आहे. संयम, कामकाज झाल्यानंतर कार्यालय सोडून घरात प्रवेश करतानाची मानसिकता, याचे विशिष्ट धडे देऊन कर्मचाऱ्यांना दोन्ही पातळ्यांवर समन्वय साधण्याची जीवनमूल्येही येथे शिकवली जातात.