महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्य़ात..

राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्य़ातच सर्वाधिक कुपोषित बालके असल्याचे निदर्शनास आले आहे. कुपोषण मुक्तीसाठी घरपोच व अंगणवाडीत पोषण आहार पुरविला जात असतानाही बालकांच्या कुपोषणाची संख्या कशी वाढली, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

बीड जिल्ह्य़ातील अंगणवाडय़ांमधील शून्य ते सहा वर्षे वयोगटापर्यंतची तब्बल २९१ बालके पूर्णत: कुपोषित तर दोन हजार ६०३ बालके अतिकमी वजनी गटात असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत आढळून आले. त्यातील सहा बालकांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बीड जिल्ह्य़ात राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानांतर्गत ४० पथकांमार्फत दर तीन महिन्यांनी अंगणवाडीतील शून्य ते सहा वयोगटापर्यंतच्या बालकांचे वजन, उंची, डोक्याचा व दंडाचा घेर यांची तपासणी केली जाते. विशेष म्हणजे युनिसेफने दंडाचा घेर मोजण्याची पद्धत काही वर्षांपूर्वी सदोष असल्याचे स्पष्ट केले होते.

जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत कुपोषणाचे सरासरी प्रमाण वाढलेले असते, असे आरोग्य अधिकारी स्पष्ट करतात. बीड जिल्ह्य़ात मार्च, २०१५ मध्ये झालेल्या तपासणीत ३८१ आणि मार्च, २०१६ मध्ये करण्यात आलेल्या तपासणीत २१२ पूर्ण कुपोषित बालकांची संख्या आढळून आली होती. त्यानंतर या बालकांवर लक्ष केंद्रित केल्याने जूनच्या तपासणीत यापकी १९८ बालकांमध्ये सुधारणा होऊन या श्रेणीतून ही बालके बाहेर आली. त्यामुळे वजन कमी जास्त होणे ही साधारण प्रक्रिया असल्याचा दावा या विभागाकडून केला जात आहे. महिला व बालकल्याण विभागातर्फे दर महिन्याला अंगणवाडय़ांमधील बालकांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. मात्र, असे असताना कुपोषित बालकांची संख्या कमी होताना दिसत नाही, हे विशेष.

  • जूनमध्ये जिल्ह्य़ातील २ हजार ४०६ अंगणवाडय़ांत नोंद असलेल्या २ लाख ३४ हजार ३४ बालकांपकी १ लाख ९४ हजार १९ बालकांची वजन तपासणी करण्यात आली.
  • साधारण श्रेणीत १ लाख ७४ हजार ४४८ तर मध्यम कमी वजन श्रेणीतील १६ हजार ९९८ बालके आढळली.
  • तीव्र कमी वजन श्रेणीतील २ हजार ६०३ आणि पूर्ण कुपोषित बालकांची संख्या २९१ आढळून आल्याची नोंद प्रशासकीय दफ्तरी झाली आहे.