खासदार अशोक चव्हाण यांची टीका
सरकारमध्ये राहून निर्णय घ्यायचे असतात. ते न करता मोर्चे काढायचे असतील, तर शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडावे. तसेच सरकारच्या अपयशाची आणि नाकर्तेपणाची जबाबदारीही शिवसेनेला घ्यावी लागेल, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर टीका केली.
दुष्काळी मदतीतून कापूसउत्पादक शेतकऱ्यांना वगळल्याच्या निषेधार्थ येत्या १६ फेब्रुवारीला औरंगाबाद येथे शिवसेना मोर्चा काढणार आहे. या पाश्र्वभूमीवर चव्हाण बोलत होते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या दशकपूर्तीनिमित्ताने आयोजित राज्यस्तरीय परिषदेसाठी ते येथे आले होते.
शिवसेनेला सत्तेतही राहायचे आहे आणि विरोधी पक्षाचीही जागा घ्यायची आहे. त्यांना तसे करता येणार नाही. सध्याच्या अयशस्वी कारभारास भाजप जेवढा जबाबदार आहे, तेवढीच शिवसेनेचीही हिस्सेदारी आहे, असे सांगत चव्हाण यांनी शिवसेनेला फटकारले.
‘आदर्श’ प्रकरणात पूर्वी राज्यपालांनी खटला दाखल करण्याची आवश्यकता नाही, असे अभिप्राय देऊन ते प्रकरण बंद करण्यास मान्यता दिली होती. केवळ राजकीय सूडबुद्धीने पुन्हा एकदा राज्य सरकार ही कारवाई हाती घेत आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. ते म्हणाले, की केवळ मी एकटाच नाही तर दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेसच्या १५-२० जणांबाबत केंद्र सरकार सूडबुद्धीने वागत आहे. राज्य सरकारही त्यांचेच अनुकरण करीत आहे. भुजबळांवरील कारवाईबाबत मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले.