संभाजीराजे छत्रपती यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना आम्ही राजघराणेपण विसरून सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणूनच राहिलो. स्थानिक नेते हसन मुश्रीफ यांच्याकडून मात्र कायम हेटाळणी व्हायची. कधीही सन्मान दिला गेला नाही, अशी टीका करीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रवादीच्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात सन्मानाची वागणूक मिळत असल्याचे सांगितले. मी भाजपचा खासदार नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्यत्व बहाल करणे हे राजघराण्याचा सन्मान करण्याचेच प्रतीक आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मंगळवारी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कर्जमाफी, गडकिल्ल्यांचे संवर्धन, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव आदी अनेक मुद्दय़ांवर संभाजीराजे यांनी आपली मते मांडली. ते म्हणाले, ‘माझी खासदारकी ही भाजपसाठी काम करावे, यासाठी दिलेली नाही. मला छत्रपतींचे, शाहू महाराजांचे वंशज या नात्याने राजघराण्याचा सन्मान म्हणून राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे सदस्य बनवले आहे. हे पद स्वीकारावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्तिश: फोन केला.  लखनौ येथील अधिवेशनस्थळी आपले आगमन झाल्यानंतर सन्मान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उठून उभे राहिले. पाठोपाठ अडवाणीही व त्यानंतर अवघे मंत्रिमंडळातील नेते उभे राहिले. हा सन्मान देण्याचाच एक भाग आहे.’ केवळ एवढेच नाही तर महाराष्ट्र सरकारनेही गडकिल्ले संवर्धनासाठी ‘सदिच्छा दूत’ बनवले.  वास्तविक पद तसे शोभेचे आहे, मात्र त्या माध्यमातून सरकारकडून किल्ले संवर्धनासाठी दबावगट तयार करता येतो. त्यासाठीच हे पद स्वीकारले आहे. सरकार व सर्वसामान्य माणूस यांच्यातील दूत म्हणूनही या पदाचा उपयोग करता येतो. मोदी सरकारला दिल्लीत पाठिंबा असला तरी जे विचार पटणार नाहीत त्याला आमचा विरोधही राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.   मोर्चाच्या रूपात मराठा समाज रस्त्यावर उतरला. त्यामध्ये नेतृत्व कोणी करावे हा वादाचा विषय होऊ शकतो. पण त्यासाठी आपण जनजागृती मात्र आवर्जून केली. संसदेतही आरक्षणाचा मुद्दा उठवल्याचा दावाही संभाजीराजे यांनी केला. दलित-सवर्ण हा वाद मिटवण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय हा अभिनंदनीय आहे. मात्र त्यासाठी आपणच ६ जून रोजी रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक उत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्ज घेण्याची वेळ आली तरी चालेल, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केल्याचा दावाही संभाजीराजे यांनी केला.

गड, किल्ले संवर्धनासाठी महामंडळ हवे

राज्यातील शिवकालीन गड, किल्ल्यांचे संवर्धन करून हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी राज्य सरकारने एक महामंडळ स्थापन करावे. त्यासाठी सरकारने ५०० कोटींची दरवर्षी तरतूद करावी, अशी मागणी करून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी रायगड किल्ल्याच्या कामावर होत असलेल्या खर्चाचा लेखाजोखा मांडला. ६०० कोटी रुपयांत १२५ कोटी रायगडच्या संवर्धन कामासाठी, ८० कोटी जिजाऊंच्या वाडय़ासाठी, महाड ते रायगड मार्गासाठी २०० कोटी, तर ५० कोटींतून रायगडात ८५ एकर जमीन खरेदी करून त्यावर विकासकामे केली जाणार आहेत. उर्वरित रक्कम अन्य कामांवर खर्च करण्यात येणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.