खासदार किरीट सोमय्या यांचा आरोप
अण्णा भाऊ साठे महामंडळातून विधानसभा निवडणुकीपूर्वी ९५ कोटी रुपयांची रक्कम रोख स्वरूपात काढून बनावट व्यक्तींना वितरित केल्याच्या नोंदी घेण्यात आल्या. वास्तविक, ही रक्कम राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत वापरली. यात सहभागी असणारे आमदार रमेश कदम यांच्यासह सहा आमदारांवर कारवाई होईल. या संबंधाने मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन निवेदन दिले असल्याची माहिती खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.
मराठवाडय़ातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी सोमय्या औरंगाबाद व जालना जिल्हय़ांच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी पत्रकार बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. अण्णा भाऊ साठे महामंडळातील अनुसूचित जाती-जमातीमधील युवकांना स्वयंरोजगार देण्याच्या उद्देशाने वाहनकर्ज दिले जाते. या कर्जाचा वापर करून काही श्रीमंत व भ्रष्ट नेत्यांनी मर्सिडिज, ऑडीसारख्या महागडय़ा गाडय़ा घेतल्याचा आरोप त्यांनी केला. सोपान गायके हा तरुण अनुसूचित जाती-जमातीमधील नसूनही त्याने संजय साठे व नामदेव कालशे यांच्या नावावर गाडय़ा घेतल्या. सोपान गायके याची अंबड तालुक्यात १०५ एकर जमीन आहे. तसेच सतीश वाघमारे, राम शिंदे, रमेश गायकवाड व दशरथ कासबे यांच्या नावाने गृहकर्ज घेतले आणि शाबीर एम. मुलानी या व्यक्तीने महागडय़ा गाडय़ा घेतल्याचा आरोपही खासदार सोमय्या यांनी केला.
कोळसा घोटाळय़ात राजेंद्र दर्डा यांना कारागृहात पाठविणार असल्याचा संकल्प औरंगाबादेत केला होता. आता अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात कंबर कसली आहे. येत्या काही महिन्यांत कोळशाच्या दलालीत हात काळे करणाऱ्यांवर कारवाई होईल, असे सोमय्या म्हणाले. मात्र, दर्डा यांच्यावरील दोषारोपपत्र आणि पुढील कारवाई यावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.

‘..तर ही वेळ आली नसती’
नांदेड जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त लोक घाटकोपर भागात स्थलांतरित झाले आहेत. त्यांना मदत करीत असल्याचा दावा खासदार सोमय्या यांनी केला. स्थलांतरित होण्याची वेळ दुष्काळग्रस्तांवर आली, यास सरकारचे अपयश म्हणता येणार नाही का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की सिंचन घोटाळय़ातील ७० हजार कोटींपैकी २५ हजार कोटी खर्च झाले असते, तरी ही वेळ आली नसती. मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव देवेंद्र असले, तरी ते पाऊस पाडू शकत नाहीत. कमीत कमी स्थलांतर व्हावे, असे प्रयत्न केले आहेत.