पावसाने सरासरी ओलांडत जोरदार हजेरी लावल्याने सुखावलेल्या शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर तूर पिकाचे उत्पादन घेतले आहे. पाचवीला पुजलेल्या दुष्काळाने कोंडीत सापडलेल्या बळीराजाला तुरीच्या उत्पादनातून आíथक फायदा होईल, असे वाटत असतानाच या वर्षी शासनाने कमी भाव दिला आहे. आधीच भाव नाही, त्यातच आता शासनाने खरेदी बंद करत ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’ दिल्या आहेत. आवक वाढल्याने सर्वच गोदामे भरली असून, बाजार समित्यांनी तूर खरेदी बंद केल्याचे फलक झळकावले आहेत.

[jwplayer PQhFKbIz]

बीड जिल्ह्य़ात दहा कृषी उत्पन्न बाजार समितींकडून नाफेडअंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली होती. आधारभूत किमतीप्रमाणे िक्वटलसाठी ५ हजार ५० रुपयांचा भाव मिळत असताना व्यापाऱ्यांकडून मात्र ३ हजार ८०० ते चार हजार रुपये भाव देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी केंद्रावर तूर घालण्यास सुरुवात केली. या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे तुरीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर झाले असून, बाजार समितीतील आवक वाढली आहे. बीड बाजार समितीच्या आवारातील केंद्रावर आतापर्यंत ३९ हजार िक्वटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तेथील गोदामे तुरीने भरली असून, मागील तीन ते चार दिवसांपासून पाच ते सात हजार िक्वटल तूर उन्हात पडलेली आहे. तुरीचा साठा जोपर्यंत उठवला जात नाही तोपर्यंत खरेदी बंद करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. बीडप्रमाणे गेवराईतही गेल्या चार ते पाच दिवसांत सात हजार िक्वटल तुरीची आवक झाली असून, माल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणीही खरेदी बंद करण्यात आली आहे. माजलगाव बाजार समितीतही हेच चित्र पाहायला मिळत असून, या ठिकाणी आतापर्यंत २१ हजार िक्वटल तूर खरेदी झाली आहे. दररोज सात काटय़ांवर येणाऱ्या तुरीचे माप घेतले जात असूनही आवक कमी होत नसल्याचे पाहून बाजार समितीने खरेदी बंद केली आहे. इतर खरेदी केंद्रांवरही तूर खरेदी बंद केल्याचे फलक लावण्यात आले आहेत. नोटाबंदीनंतर आíथक कोंडी झालेल्या शेतकऱ्यांनी धान्य आता बाहेर काढण्यास सुरुवात केली नाही तोच खरेदी केंद्र बंद झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

बाजार समित्यांकडे बारदानांचीही वानवा

बाजार समितीच्या आवारात नाफेडमार्फत सुरू असलेल्या खरेदी केंद्रांवर तुरीची आवक वाढली आहे. मागील चार ते पाच दिवसांमध्ये झालेली आवक पाहता त्याचा साठा करण्यास जागाही अपुरी पडू लागली आहे. त्यातच बाजार समित्यांकडे तुरीचा साठा करण्यासाठी बारदानाही नसल्यामुळे मदानात तुरीचे ढिगारे घालावे लागत आहेत. समिती प्रशासनाने साठा झाल्यानंतर जयपूर आणि कोलकाता येथून बारदाना मागवला आहे. बारदाना येण्यास तीन ते चार दिवसांचा अवधी लागणार असल्याने तोपर्यंत खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

[jwplayer wZyE3FMT]