अकोला-परभणी प्रवासी रेल्वेमध्ये िपगळी स्टेशनवर दागिने हिसकावून घेण्यास दोन चोरटय़ांना प्रतिकार केल्यामुळे महिलेचा चाकूने गळा चिरून खून करण्यात आला. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, रेल्वेमध्ये चोरीच्या घटना मोठय़ा प्रमाणात वाढल्या असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषत: दिवाळीच्या दिवसात प्रवाशांची वाढती गर्दी असताना अशी घटना घडल्याने महिला वर्गात भीतीने थरकाप उडाला.
दिवाळी सणानिमित्त रेल्वेमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी आहे. रात्रीच्या अकोला ते परळी प्रवासी रेल्वेगाडीला मात्र फारशी गर्दी नव्हती. िहगोली तहसील कार्यालयात कार्यरत सविता मल्लिकार्जुन कापसे मावसभाऊ प्रभू तुकाराम पाटील (शिवणी जाट, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा) याच्या समवेत त्या अकोला-परळी रेल्वेने सासरी परळी येथे निघाल्या होत्या. रेल्वे िपगळी स्टेशनवर आली असता दोन चोरटे प्रवासी डब्यात घुसले व चाकूचा धाक दाखवून त्यांनी प्रभू पाटील यांचा मोबाईल, त्यांच्याकडील ३ हजार १०० रुपये काढून घेतले. त्यानंतर सविता कापसे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला. हातातील बॅग चोरटे ओढत असताना सविता यांनी प्रतिकार केला. त्यामुळे एका चोरटय़ाने त्यांच्या गालावर व गळ्यावर चाकूने वार केले. चाकूच्या वाराने गळा चिरल्याने सविता यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह िपगळी स्टेशनवर उतरवून घेतल्यानंतर रेल्वे परळीकडे रवाना करण्यात आली. पूर्णा रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून मध्यरात्रीनंतर सविताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी परभणीच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. प्रभू पाटील यांच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गेल्या काही दिवसांपासून रेल्वेची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. प्लॅटफार्मवर चोरीच्या घटना घडत आहेत. एवढेच नाही, तर प्रवासी गाडय़ांमध्येही या घटना घडू लागल्या आहेत. रात्री उशिरा धावणाऱ्या गाडय़ांमधून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपी फरारी असून कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.