मराठा, दलित, ओबीसी पाठोपाठ आता मुस्लीम समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी तालुका पातळीवर मूक मोर्चाची हाक देत पूर्वीच्या गर्दीचे उच्चांक मोडण्यास सुरुवात केली आहे. शिस्तबद्ध मोर्चानी बुधवारी केज शहरातील रस्ते पांढऱ्या शुभ्र गणवेशातील मोच्रेकऱ्यांच्या गर्दीने व्यापून गेले होते. मुस्लीम समाजाच्या मोर्चाचे नेतृत्वही शालेय विद्यार्थिनींनीच केले. या मोर्चाला मराठा समाजाने पािठबा दिला, होता हे विशेष.

बीड जिल्ह्यातील केज शहरात बुधवारी मुस्लीम समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. सकाळपासूनच गावागावांतून समाजबांधव दर्गा परिसरात दाखल होत होते. सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. आंबेडकर चौक, मंगळवार पेठमाग्रे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. कळंब चौकामध्ये एकत्रित झालेल्या मोच्रेकऱ्यांमुळे अंबाजोगाई आणि मांजरसुंब्याकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली होती. त्या ठिकाणी मोच्रेकऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पांढऱ्या गणवेशात मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ‘शिक्षण-आरक्षण आणि संरक्षण’, ‘एकच मिशन- मुस्लीम आरक्षण’ अशा घोषवाक्यांचे फलक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये होते. महाविद्यालयीन विद्यार्थिनीही मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. तरुणांच्या हातामध्ये हिरवे झेंडे होते. शिक्षणात मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, भारतीय मुस्लीम समाजासाठी पर्सनल लॉ बोर्ड ही व्यवस्था ‘कुरआन’ या पवित्र ग्रंथावर आधारित असून त्यामध्ये हस्तक्षेप करू नये, मौलाना आझाद आíथक विकास महामंडळाला एक हजार कोटींची तरतूद करून समाजाच्या छोटे उद्योग करणाऱ्या तरुणांना कर्ज वाटप करण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन पाच विद्यार्थिनींनी प्रशासनाला दिल्यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला.

मोर्चात सहभागी झालेल्या मुस्लीम बांधवांसाठी मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी पाणीवाटप करण्यात आले. मोर्चानंतर स्वयंसेवकांनी मोर्चा मार्गावर स्वच्छता मोहीम राबवली.