गंगा स्वच्छतेच्या राष्ट्रीय मिशनच्या सदस्यत्वाचा जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी अलीकडेच राजीनामा दिला आहे. गंगा प्रदूषण थांबविण्यासाठी सुरू असणारे प्रयत्न तोकडे पडत आहेत. ‘अलाहाबाद, कानपूर, वाराणसीसह गंगा किनाऱ्यावरील नगरपालिका आणि महापालिका या कामांकडे दुर्लक्ष करीत आहेत. ४० हून अधिक कारखान्यातून गंगेच्या पाण्यात घाण सोडली जाते. प्रदूषण काही थांबत नाही. केवळ लोकजागृती करुन हा प्रश्न सुटेल, असे मांडले जाते, ते खरे नाही. आता गंगा शुद्ध होण्याचे काम फारसे होणार नाही, असेच चित्र दिसत आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी योजनेतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता, अशी खंत चितळे यांनी व्यक्त केली. गंगा नदीचे प्रदूषण रोखता येऊ शकते, असे भाषण ‘स्टॉक होम पुरस्कार’ मिळण्यापूर्वी त्यांनी स्वीडनमध्ये केले होते. त्या भाषणाच्या प्रभावामुळे पुढे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. त्या पुरस्कार मिळण्याच्या घटनेला आता २५ वष्रे पूर्ण होत आहेत. दुर्दैवाने गंगा स्वच्छ होईल का,’ या विषयी मनात शंका असल्याची खंत चितळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

गुजरातमध्ये नर्मदा स्वच्छ करण्याच्या कामामध्ये जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते मुख्यमंत्री असताना मदत केली होती. त्या कामात कमालीचे यश मिळविल्यानंतर ‘नमामि गंगे’ या प्रकल्पामध्ये माधवराव चितळे यांची खास नेमणूक करण्यात आली होती. तत्पूर्वी गंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत होता. तेव्हा भारत सरकारचे सचिव म्हणून चितळे काम पाहत होते. या अनुषंगाने त्यांनी एक भाषण आंतरराष्ट्रीय अभ्यासकांसमोर दिले होते. त्यानंतर जलक्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन १९९३ मध्ये त्यांना ‘स्टॉक होम’चा बहुप्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला होता. २५ वर्षांपूर्वी मिळालेल्या या पुरस्काराची आठवण सांगताना ते म्हणाले, ‘त्या दिवशी स्वीडनच्या ध्वजाबरोबर भारतीय ध्वज लावण्यात आला होता. त्याचदिवशी ब्रिटनचा झेंडा मात्र काहीसा कमी उंचीवर होता. त्याचाही एक आनंद होता. पण, या पुरस्कारापूर्वी गंगा प्रदूषण दूर करता येऊ शकते, याची शक्यता आता दुर्दैवाने कमी दिसते आहे. त्यात भारतीय मानसिकतेचाही भाग आहे. एकदा दिवसभर आम्ही नदी प्रदूषणावर चर्चा केली. रात्री गोमती नदीची आरती केली आणि निर्माल्य पुन्हा नदीत टाकले. निर्माल्य टाकण्याच्या या कृतीने कमालीचे वाईट वाटले.

भारतीय मानसिकतेमध्ये नदीचे कितीही मंत्र आणि श्लोक असले तरी आपली कृती योग्य नाही. अशीच स्थिती गंगेची आहे. तेथे तर नदीत मृतदेहदेखील टाकले जात. आता त्यात बदल झाले आहेत. पण प्रदूषण रोखणारी यंत्रणा उभी करण्यासाठी उत्तरप्रदेशातील नगरपालिका आणि महापालिका लक्ष देत नाहीत. येथे काहीही केले तरी काम उभे राहील, असे वाटत नाही.’ त्यामुळे सदस्यत्वाचा राजीनामा नुकताच दिल्याचे चितळे यांनी सांगितले. या विभागाच्या मंत्री उमा भारती आहेत हे विशेष.

हा प्रश्न केवळ सरकारी मानसिकतेचा नाही. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळापासून या प्रकल्पावर काम करत होतो. केंद्र सरकारकडून गंगा स्वच्छ व्हावी, असेच धोरण कायम आहे. मात्र, उत्तरप्रदेश सरकार आणि महापालिकांच्या स्तरावर काम करणारी यंत्रणा दुबळी असल्याने प्रश्न निर्माण झाल्याचे चितळे सांगतात.