मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त ५२५ शेतकरी कुटुंबीयांना सामाजिक बांधिलकी जपून धीर देऊन आर्थिक मदत करणारे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे उद्या (शुक्रवारी) पुन्हा एकदा शहरात येणार आहेत. त्यांनीच स्थापन केलेल्या नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागात समाजातील दानशूर व्यक्तींकडून ते आर्थिक मदत स्वीकारणार आहेत.
सतत दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे सकाळी १० वाजता पाटेकर व अनासपुरे भेट देतील. दुपारी साडेतीन वाजता विवेकानंद महाविद्यालयाजवळील हॉटेल अँबेसी येथे थांबून नाम फाऊंडेशनसाठी ते मदत स्वीकारणार आहेत. ज्या ज्या व्यक्तींना नाम फाऊंडेशनला मदत करायची आहे, त्यांना पाटेकर व अनासपुरे यांना या वेळी प्रत्यक्ष भेटून ही मदत करता येईल, असे नाम फाऊंडेशनच्या कार्यकारिणी सदस्या शुभा महाजन, मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके यांनी सांगितले.