23 October 2017

News Flash

भाजपचा भपका हवेत, अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब!

मतदारांना आकर्षित करुन घ्यायचे, हे प्रचार तंत्र नांदेडमध्ये चालणार नाही

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद | Updated: October 13, 2017 1:25 AM

नांदेड महापालिकेत दणदणीत विजय मिळवल्यानंतर गुरुवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

मोठा भपका निर्माण करायचा आणि मतदारांना आकर्षित करुन घ्यायचे, हे प्रचार तंत्र नांदेडमध्ये चालणार नाही, असा अंदाज बांधला जात होता तो खरा ठरला. नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला. त्यामुळे अशोकरावांच्या नेतृत्त्वावर उभे केले जाणारे प्रश्नचिन्ह या पुढे शिल्लक राहणार नाही. या निकालाचे राज्याच्या राजकारणावर बरेच परिणाम होतील. त्यापेक्षाही काँग्रेस अंतर्गत असणारी मरगळ या यशामुळे पुन्हा झटकली जाईल, अशी आशा करायला हरकत नाही. पण हे करण्यासाठी केवळ मतदारसंघापुरते अशोकराव संवेदनशील असतात अन्यत्र नाही, ही त्यांची प्रतिमा त्यांना आता दूर करण्याची संधी आहे.

नांदेड महापालिकेचा निकाल आखणी एका अर्थाने अधिक महत्त्वपूर्ण मानला जात आहे तो एमआयएमच्या पराभवामध्ये दडला आहे. गेल्या निवडणुकीत राज्याच्या राजकारणात ओवेसी यांनी मुसांडीच मारली होती. मुस्लिम भावनांना हात घालून तब्बल ११ नगरसेवक निवडून आल्याने काँग्रेसचा मुस्लिम मतदारांचा पायाच खचला असल्याचे चित्र दिसत होते. औरंगाबाद मध्य मतदारसंघात त्यांनतर ‘एमआयएम’ला विजय मिळाला. ओवेसी बंधूनी तळ ठोकूनही त्यांच्या पदरी अपयश आले. त्यांच्या सभा मुस्लिम मतदारांना आपल्या बाजूने वळवू शकली नाहीत, असेच निकालावरुन स्पष्ट झाले. याचा परिणाम अन्य निवडणुकांवर होण्याची दाट शक्यता आहे. हिंदू-मुस्लिमांमध्ये भयाचे वातावरण निर्माण करुन निवडणुका जिंकण्याचे तंत्र मराठवाडय़ात अनेकदा यश मिळवून देते, असा इतिहास आहे. परभणी सारख्या शहरात खान की बाण असा प्रचारच होतो. कॉंग्रेसच्या नांदेडच्या यशाचे सूत्र या धारणेला छेद देणारे असल्याचे सांगण्यात येते.

अशोकरांना घेरा म्हणजे मतदार आपल्या बाजूने वळतील, अशी प्रचार यंत्रणा भाजपच्या धुरणींनी आखली होती. मतदानापूर्वी दोन दिवस आधी सदनिकांचा घोळही बाहेर काढण्यात आला. त्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तोंडघशी पडले. एकूणच अशोकरावांना घेरण्याचे तंत्र फार पद्धतशीरपणे होते, हे निवडणुकांपूर्वीपासून स्पष्ट होते. कॉंग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्यापासून ते शिवसेनेच्या नेत्यांनाही आपल्या बाजूने वळविण्यापर्यंत केलेले सर्व प्रकार उपद्व्याप श्रेणीतील होते, हे आता निकालानंतर स्पष्ट झाले आहे. प्रताप पाटील चिखलीकर हे विलासराव देशमुखांचे कार्यकर्ते. त्यामुळे त्यांनी नेहमीच चिखलीकरांना बळ दिले होते. त्यांचे निधन झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात जम बसवायचा असेल तर अशोक चव्हाणांना लक्ष्य करणे हे राजकारणाचे सूत्र म्हणून चिखलीकर राष्ट्रवादीमध्ये गेले. लोहा मतदारसंघातून राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळणार नाही, असे दिसताच चिखलीकरांनी शिवसेनेमध्ये उडी मारली. लोहा मतदारसंघाचे राजकारण करणारा माणूस शहरी नांदेडमध्ये चालेल का, याचा सारासार विचार न करता भाजपने प्रचाराची सर्व यंत्रणांच त्यांच्या ताब्यात दिली. त्यामुळे भाजपसाठी वर्षांनुवष्रे झटणारी माणसे काहीशी दूर गेली.

ही भावना फक्त नांदेडमध्येच आहे, असे नाही. जो कोणी भाजपमध्ये येईल तो पवित्र होईल, असे धोरण असल्यासारखे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची वर्तणूक होती. पक्षात काल परवा आलेल्या व्यक्तींना मोठे पद द्यायचे आणि राबणारा कार्यकर्ता तसाच सतरंजी उचलण्यापुरता ठेवायचा, असे चालले होते. भाजपचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर परंडय़ाचे, संभाजी पाटील निलंगेकर लातूरचे. मग नांदेडचे नेते कोण, आणि त्यांच्याकडे कोणती जबाबदारी होती, हे जरी नेतृत्वाने तपासले तरी भाजपचे अपयश नक्की कोणत्या कारणामुळे हे कळू शकेल. उमेदवारी कोणी दिली आणि कोणाला याचे सुरस किस्से आता भाजपमध्ये चर्चेत आहेत. सुधाकर, पांढरे, बसेन, शकंरसिंग गाडीवाले यांना उमेदवारी द्या, असे सांगितल्यानंतरही त्या प्रभारींनी नाकारल्या.

मग शिवसेनेच्या आमदारांनी त्यांच्या पुतण्याला आणि श्यामसुंदर शिंदे यांनी शालिनी पवळे यांना उमेदवारी मिळवून दिली.  मग भाजप वाढावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी निवडणुकीमध्ये काय करायचे, असा विचार भाजप नेत्यांनी केला नाही. केवळ भपका केला की आपला विजय निक्की, असा आत्तापर्यंचा अनुभव या वेळी कामी आला नाही आणि यशाचे गणित फिसकले. दोन्ही अंकी संख्याही गाठता आली नाही. अशीच अवस्था शिवसेनेची होती. त्यांना आपला शत्रू कोण आणि मित्र कोण, हेच ठरवता येत नाही. सत्तेत बसताना मित्र आणि निवडणुका लढताना शत्रू, अशी विचित्र निती शिवसेना पक्षप्रमुखांनी ठेवली. खरे तर नांदेडमध्ये सेनेची ताकद तशी नव्हतीच. विधानसभा निवडणुकीत भाग्य उजळले आणि चार आमदार निवडून आले म्हणजे आपली संघटनाही या जिल्ह्यात मजबूत आहे, असे उगाच पूर्वीचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्यासह सर्वाना वाटत असे. नंतर मराठवाडय़ाचा कारभार दिला गेला तो पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना. कदम हे स्वत:चे वर्चस्व वाढविण्यासाठी स्थानिक नेतृत्वाला हीन लेखतात, हा औरंगाबादचा अनुभव असतानाही त्यांच्याकडे प्रचाराची धुरा दिली गेली. परिणामी केवळ एका जागेवर शिवसेनेला समाधान मानावे लागले.

चिखलीकरांचे काय?

काँगेसच्या नेत्यांवर मोठे आरोप केले गेले. महापालिका निवडणुकीच्या काळात भाजप प्रवेश इच्छुक नारायण राणे यांनीही अशोकरांवा लक्ष्य केले. त्यावर कोणतीही आक्रस्ताळी प्रतिक्रिया न देता अशोकरावांनी बांधलेल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा जोडून घेतले. भाजपा हा पक्ष फसवणूक करणारा आहे, हे काँग्रेसचे नेते सांगत गेले. त्यात जसे स्थानिक विषय होते तसेच राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील उदारहरणे दिली गेली. नोटबंदीपासून ते शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे अनेक विषय मतदारांपर्यंत फसवणुकीची उदाहरणे म्हणून ठेवण्यात आली आणि काँग्रेसच्या पदरी मतदारांनी भरभरुन टाकले. महापालिकेमध्ये मिळालेली ही एकहाती सत्ता केवळ स्थानिक प्रतिक्रिया होती, असे भाजपची मंडळी आता सांगू लागली आहेत. पण, भाजप विषयीचा रागही या मतदानातून दिसून आला. एवढय़ा रणधुमाळीमध्ये अशोकराव चव्हाण यांनी कधी प्रचाराची पातळी खाली घसरू दिली नाही. अगदी नारायण राणे यांनी टीका केल्यानंतर ते त्यांना माझ्या शुभेच्छा, एवढेच सांगत होते. या सगळया रणनितीमध्ये आता शिवसेनेमध्ये राहून भाजपचा प्रचार करणाऱ्या चिखलीकरांचे काय होणार, असा प्रश्न आहेच.

First Published on October 13, 2017 1:25 am

Web Title: nanded municipal corporation election 2017 ashok chavan emerges congress champion part 2