प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्य़ाचे प्रभारी म्हणून नियुक्त केलेल्या आमदार धनंजय मुंडे यांच्या पहिल्याच दौऱ्यात पक्षाचा जिल्हाध्यक्ष तत्काळ बदला, असा सूर निघाला. त्याच वेळी ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम यांनी जिल्ह्य़ातील पक्षाचे अस्तित्व व भवितव्य याबद्दल चिंता व्यक्त केली.
शनिवारी सायंकाळी नांदेडमध्ये आलेल्या मुंडे यांनी मिनी सह्य़ाद्री विश्रामगृहात पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र, या बैठकीकडे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पाठ फिरवल्याने जिल्ह्य़ातील पक्षाच्या एकंदर स्थितीचा मुंडे यांना अंदाज आला. त्यांनी नंतर कदम यांच्या भाग्यनगरातील निवासस्थानी भेट दिली. तेथे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर हजर नव्हते. या वेळी कदम यांनी पक्षाच्या एकंदर कारभारावर नाराजी व्यक्त केली. जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे काहीजण काँग्रेससोबत आहेत. काहींचे मित्र शिवसेना-भाजपत असल्याने ते त्यांच्यासोबत.. अशा स्थितीमुळे पक्षाला स्वतंत्र अस्तित्व राहिले नाही. आपला पक्ष वाढला पाहिजे, अशी धारणाच राहिली नाही, असे ते म्हणाले.
अलीकडेच बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने लोहा येथे काँग्रेससोबत आघाडी केली. त्याच वेळी जिल्हाध्यक्षांनी नांदेड व नायगाव बाजार समिती निवडणुकांत भाजप-सेनेसोबत महायुती केली. सर्वत्र पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर जिल्ह्य़ाध्यक्षांच्या एकंदर कारभारावर पक्षातूनच नाराजीचा सूर निघत आहे. त्यातच एका ज्येष्ठ नेत्याने या सुरात सूर मिसळल्यानंतर पक्षातील गोरठेकर विरोधक सुखावले आहेत.
देगलूरच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांने तर जिल्हाध्यक्ष बदलण्याचीच मागणी केली. पक्षाच्या एका युवक पदाधिकाऱ्याचे या मागणीला अनुमोदन आहे, असे दिसून आले. मुंडे यांच्या धावत्या दौऱ्यात प्रदेश उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर हजर होते. त्यांनी आक्रस्ताळेपणा न करता जिल्ह्य़ात तुम्हाला जास्त लक्ष घालण्याची गरज आहे, अशी सावधगिरीची सूचना मुंडे यांना केली.
कदम यांच्याकडील भेट-चर्चा आटोपल्यानंतर मुंडे ज्येष्ठ नेते रामनारायण काबरा यांच्या निवासस्थानी गेले. देगलूर व हदगाव येथील कार्यकर्त्यांचा गट नंतर काही वेळ कमलकिशोर कदम यांच्या घरीच होता. या गटाच्या वतीने रमेश देशमुख निवळीकर यांनी आता जिल्हाध्यक्ष बदलल्याशिवाय पक्षाचे भले होणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितल्याचे कळते. कदम यांच्या घरी शहर जिल्हाध्यक्ष हजर होते; पण ग्रामीण जिल्हाध्यक्षांना येण्याची सूचना नव्हती, यातून कदम यांचा कल काय, ते स्पष्ट झाले. मुंडे यांच्या दौऱ्यातील घडामोडींची माहिती पक्षाच्या दुसऱ्या एका ज्येष्ठ नेत्याला रात्री उशिरा देण्यात आली. हा ज्येष्ठ नेताही ‘बापूसाब’वर नाराज असल्याचे कळते. या नेत्याच्या चिरंजीवाने नुकतेच संपर्क कार्यालय सुरू केले. ते नायगाव मतदारसंघात असले, तरी याप्रसंगी जिल्हाध्यक्षास बोलविण्यात आले नाही. पक्षाचा एक जि. प. सदस्य याच मतदारसंघात आपले जाळे विस्तारत आहे.