काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या नारायण राणे यांच्यावर शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रहार केला आहे. नारायण राणे यांना पैशांची गुर्मी आहे. पैशांच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते. भाजपने राणेंसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला पक्षात थारा देऊ नये. भाजपने त्यांना पक्षात स्थान दिले तर एकप्रकारे राजाश्रय मिळेल, असे ते म्हणाले.

केसरकर यांनी जालना येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी भाजपला सल्ला दिला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला भाजपने थारा देऊ नये. त्यांना पक्षात घेतले तर एकप्रकारे गुन्हेगारीलाच राजाश्रय मिळेल, असे ते म्हणाले. संख्याबळाचा विचार केला तर भाजप आमचा मोठा भाऊ आहे. त्या अधिकाराने आपण हे सांगत आहोत, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘झीरो टॉलरन्स’चा नारा लक्षात घेतला तर, भ्रष्टाचारी माणसाला पक्षात घ्यायचे का? याचा विचार भाजपने करावा, असा सल्ला केसरकर यांनी दिला. जनतेने राणे यांना कोकणातून दोन-तिनदा हद्दपार केले आहे. आता पुन्हा त्यांचे वर्चस्व वाढू नये, यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्राने राणेंना काय दिले? आणि राणेंनी महाराष्ट्राला काय दिले, याचा विचार करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

नारायण राणेंच्या मुलाच्या वाहनाला ओव्हरटेक केले म्हणून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली जाते. त्यांची मुले लोकप्रतिनिधींना एकेरी नावाने संबोधतात. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. त्यामुळे त्यांना कोकणातून हद्दपार केले पाहिजे आणि त्यांचे वर्चस्व पुन्हा वाढणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. राणेंच्या भाजप प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी केलेल्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.