परदेशी विद्यापीठात जगाच्या ज्ञानात भर घालणारे संशोधन असेल तरच पीएच. डी. मिळते. पण आपल्याकडे संकलन करून पीएच.डय़ा. मिळवल्या जातात. हे चुकीचे असून संशोधन करणारा देशच श्रीमंत होऊ शकतो. या साठी शाळा-महाविद्यालयात  विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन द्यावे. औद्योगिकीकरणाच्या हव्यासापोटी दीडशे वर्षांत मोठय़ा प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड वायूची निर्मिती केल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढून निसर्गाचे ऋतूचक्रच बिघडले आहे. यावर मात करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला असल्याची माहिती पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या सावरकर महाविद्यालयात सोमवारी स्वा. सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व इमारतीचे लोकार्पण सोमवारी जावडेकर यांच्या हस्ते झाले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, क्षेत्रीय संघचालक डॉ. अशोक कुकडे, डीएसके उद्योग समूहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, कार्यवाह प्रा. सतीश पत्की, आमदार लक्ष्मण पवार, आर. टी. देशमुख आदी उपस्थित होते. जावडेकर म्हणाले की, दीडशे वर्षांत माणसाने औद्योगिकरणाच्या हव्यासापोटी मोठय़ा प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड निर्माण केल्याने पृथ्वीचे तापमान वाढले. परिणामी ऋतूचक्र बिघडले. वाढलेल्या तापमानात भारताचा वाटा मात्र अल्प असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले.
पंकजा मुंडे यांनी युगपुरुष या संकल्पनेच्या पुढे जाऊन युग स्त्री संकल्पना निर्माण करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. डी. एस. कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारतीय अभ्यासक्रमात समावेश नाही. मात्र, जर्मनी, फ्रान्स, इस्राईल या देशांमधील अभ्यासक्रमातून शिकवले जातात. यापुढे व्ही फॉर विनायक एस फॉर सावरकर असे शिकवावे, असे आवाहन केले. डॉ. अशोक कुकडे यांनी बुद्धी आणि निसर्गाचा दुष्काळ बदलण्याची गरज व्यक्त केली. प्रा. सतीश पत्की यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीचा आलेख मांडला. २५ प्राध्यापकांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी संस्थेला दिला. केंद्र सरकारने संस्थेला योग विद्यापीठ मंजूर करावे, अशी मागणी केली.