तुळजापुरात आई राजा उदो उदो

तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त दुपारी बारा वाजता ‘आई राजा उदो-उदो, सदानंदीचा उदो-उदो’च्या जयघोषात भक्तिभावाने घटस्थापना करण्यात आली. मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे व प्रियंका नारनवरे यांनी मानाचे यजमानपद भूषविले.

साडेतीन शक्तिपीठातील पूर्ण शक्तिपीठ असणाऱ्या तुळजाभवानीच्या मंदिरात शारदीय नवरात्राला शनिवारी उत्साहात झालेल्या घटस्थापनेने प्रारंभ झाला. सकाळी नित्योपचार पूजा भोपे पुजारी दिलीप सोंजी कदम यांच्या हस्ते पार पडली.

दरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून नवरात्र मंडळांकडून काढल्या जाणाऱ्या भवानीज्योत यात्रांनी तुळजापूरनगरी दुमदुमून निघाली. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून शेकडो भवानीज्योत दौड तुळजापुरातून बाहेर पडल्या. आई राजा उदो-उदोच्या गजरात सकाळी ११ वाजता तीन कलशांची संबळाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महंत तुकोजीबुआ, महंत हमरोजीबुआ, महंत चिलोजीबुआ, पाळीचे पुजारी दिलीप सोंजी, भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, नगराध्यक्षा अ‍ॅड. मंजूषा मगर आदी उपस्थित होते. मंगल कलशात गोमुखाचे पाणी घेतल्यानंतर मंदिरात तुळजाभवानी मंदिर, त्रिशूल मंदिर व मातंगी मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. अंगारा व घटाचे धान्य घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रातील धार्मिक विधी व होमावरील धार्मिक कार्यक्रमासाठी डॉ. प्रशांत नारनवरे व प्रियांका नारनवरे यांनी स्थानिक ब्रह्मवृंदांना वर्णी दिली. मंदिरातील घटस्थापनेनंतर तुळजापुरातील घरोघर विधिवत घटस्थापना केली गेली. शुक्रवारी रात्री ११.३०  ते १२ पर्यंत अर्धा तास विद्युतपुरवठा खंडित झाला होता.

गेल्या दोन दिवसांपासून तुळजापुरातील गर्दीमध्ये वाढ झाली असून सर्वत्र पोलीस पहारा तनात आहे. मुसळधार पावसाने यात्रा विस्कळीत झाली असून घटस्थापनेदिनीही मोठा पाऊस झाल्याने यात्रेकरूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.