१७ नगरसेवकांना साडेसोळा हजार तर पाटोदेकरांना केवळ १० हजार मते

यंदाच्या पालिका निवडणुकीत मतदारांनी मोठय़ा खुबीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल पाटोदेकर यांना स्पष्ट नाकारले आहे. क्रॉस वोटिंगच्या या फॉम्र्युल्यामुळे उस्मानाबाद पालिकेतील राष्ट्रवादीच्या सत्तेला फटका बसला आहे. राष्ट्रवादीच्या विजयी झालेल्या सतरा नगरसेवकांच्या मतांची बेरीज १६ हजार ५४१ एवढी होत असताना पाटोदेकरांच्या पारडय़ात मात्र त्यापकी केवळ दहा हजार ४६१ जणांनीच आपला कौल नोंदविला आहे.

जिल्ह्यातील एकमेव अ वर्ग पालिका असलेल्या उस्मानाबाद नगरपालिकेच्या वर्चस्वासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार ओम राजेनबाळकर यांनी स्वतची शक्ती पणाला लावली होती. आठपकी पाच पालिकांवर निर्वविाद वर्चस्व मिळविणारे आमदार पाटील उस्मानाबाद पालिकेत मात्र पराभूत झाले आहेत. तर दुसरीकडे मतदारसंघातील कळंब पालिकेत आपला प्रभाव टाकण्यात अपयशी ठरलेल्या राजेनबाळकरांना उस्मानाबादेत यश मिळाले आहे. वास्तविक सेनेच्या विजयी झालेल्या अकरा उमेदवारांच्या मतांची बेरीज देखील नगराध्यक्ष मकरंद राजेिनबाळकर यांना मिळालेल्या मतांपेक्षा साडेतीन हजारांनी अधिक आहे.  उस्मानाबाद पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतरा, शिवसेनेचे अकरा, भाजपाचे आठ आणि अपक्ष असे सध्याचे पक्षीय बलाबल आहे. पालिकेच्या सर्वच जागांवर एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवित होते. अन्य राजकीय पक्षांना एवढय़ा मोठय़ा संख्येने उमेदवार देता आले नाहीत.

शहरातील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक नगरसेवकांना निवडून देण्याचा पायंडा यंदाही कायम ठेवला आहे. या नगरसेवकांच्या पारडय़ात पडलेल्या मतांची संख्या मागील विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांना मिळालेल्या मतांशी साम्यता दर्शविणारी आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपल्या मतांनी समर्थन देणाऱ्या मतदारांनी नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या पाटोदेकरांचे नेतृत्व मात्र यंदा स्वीकारले आहे. परिणामी नगरसेवकांच्या पारडय़ात कौल देणाऱ्या सामान्य मतदारांनी नगराध्यक्ष पदासाठी अन्य पक्षातील पर्यायाला प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट आहे.

नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपाच्या प्रमुख चार उमेदवारांसह इतर अकरा, असे पंधरा जण निवडणूक रगणात उभे होते. त्यासाठी ४६ हजार ९७७ मतदारांनी कौल दिला. २१९ जणांनी वरीलपकी एकही उमेदवार मान्य नसल्याचे नोंदवित ‘नोटा’चे बटन दाबले. तर ३० मते अवैध ठरविण्यात आली.

विजयी उमेदवार मकरंद राजेनबाळकर यांना ११ हजार ४११ मतदारांनी आपला कौल दिला. वास्तविक सेनेतून निवडून आलेल्या अकरा नगरसेवकांच्या मतांची बेरीज मात्र १४ हजार ४४ एवढी आहे. भाजपाचे पहिल्यांदाच आठ नगरसेवक निवडून आले आहेत. या आठ जणांना मिळून आठ हजार ४०० मतदान मिळाले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले भाजपाचे नितीन काळे यांच्या पारडय़ात १० हजार २२ मतदारांनी आपले समर्थन नोंदविले आहे. विजयी नगरसेवकांच्या मतांची बेरीज, तसेच पराभूत झालेल्या नगरसेवकांना मिळालेल्या मतांची संख्या, असा मेळ घातल्यास यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहत असताना थोपवलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास मात्र क्रॉस व्होटिंगच्या माध्यमातून झटका दिला आहे. त्याचा परिणाम शिवसेना आणि भाजपाला बसला नसला, तरी दहा वर्षांपासून उस्मानाबाद पालिकेत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र यंदा विरोधी बाकावर बसावे लागण्याची शक्यता आहे.