भारनियमन, पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे वाढलेले भाव, महागाई, जीएसटी आणि शेतकरी कर्जमाफी या विविध मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली. ‘मोदी सरकार रक्षक की, भक्षक?, हेच का तुमचे अच्छे दिन?, असे फलक दाखवून राष्ट्रवादीच्या कार्यकार्त्यांनी सरकारचा निषेध केला.

यावेळी रस्त्यावर चूल मांडून गॅसच्या वाढलेल्या किंमतीचा निषेध करण्यात आला. कोळशाची कृत्रिम टंचाई करून राज्यभर भारनियमन सुरु आहे. ते तात्काळ थांबवून सरकारने जनतेला अंधारातून बाहेर काढावं. आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी असताना केली जाणारी पेट्रोल-डिझेलची भाववाढ, राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बट्याबोळ उडाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सरकारकडून करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच रोजगार निर्मिती करण्यावर सरकारने भर द्यावा, अशी मागणीही राष्ट्रवादीने यावेळी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.