अलीकडच्या काळात अनेक नवीन पक्ष स्थापन होत आहेत. त्यामुळे नव्या पक्षाची निर्मिती म्हणजे एखाद्या सोसायटीची नोंदणी करण्यासारखी झाली आहे, असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारायण राणेंवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. राजकारणात नैतिकता शिल्लक राहिली आहे का? या विषयावर औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशनच्या पत्रकिरितेच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी राणेंचे नाव न घेता त्यांनी राणेंवर टीका केली.

राजकीय पक्षाच्या संख्येवर मर्यादा असायला हवी. त्यासाठी ठराविक मते मिळवण्याची अट घालण्याची गरज आहे. जर एखाद्या पक्षाला ठरवून दिलेली मते मिळत नसतील तर नवा पक्ष काढण्यापेक्षा अपक्ष उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी, असेही ते म्हणाले. भारताची घटना ही सामाजिक परिस्थितीशी अनुकूल आहे. मात्र सध्या मंत्री होणं हे एकमेव ध्येय आहे. आज निवडून आलं की, पुढच्या राजकारणाची तयारी केली जाते. मात्र यावेळी प्रत्येकानं स्वतःला लक्ष्मण रेषा घालून दिली पाहिजे. कोणीही चांगला आणि वाईट नसतो, असे सांगत निवडणूक प्रचारात होणाऱ्या खर्चावर मर्यादा घालण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारच्या कारभारात पारदर्शकता यावी यासाठी सोनिया गांधी यांनी आग्रहाने माहितीचा अधिकार कायदा आणला. मंत्रिमंडळातील अनेक जणांनी या कायद्याला विरोध दर्शवला होता. विरोधाला झुगारुन कायदा संमत केल्याची किंमत आम्हाला निवडणुकीत मोजावी लागली, असेही ते म्हणाले. निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या मालमत्ता विवरण पत्रातील त्रुटीकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. उमेदवाराने निवडणुकीच्यावेळी दाखवलेले उत्पन्न आणि त्याचे राहणीमान यातून उत्पन्नाचे उत्पन्न चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचे स्पष्ट होते.

राजकारणातील घराणेशाहीच्या मुद्यावर चव्हाण म्हणाले की, आई वडील राजकारणात होते. मात्र त्यांच्याकडून कधी राजकारणात येण्याचा आग्रह करण्यात आला नाही. परदेशातून शिक्षण पूर्ण करुन मायदेशी परतल्यानंतर राजीव गांधी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढवली. राजकीय वारसा असल्यामुळे निवडूनही आलो. अन्यथा निवडून येणे शक्य झालं नसतं. त्यामुळे राहुल गांधी यांच्याबाबत होत असलेले घराणेशाहीचे आरोप माझ्या बाबतीतही होतात.