नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला. कारण या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा बँकांनाच नोटाबदलीच्या प्रक्रियेतून वगळण्यात आले. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या जुन्या नोटा द्यायच्या कुणाकडे, असा प्रश्न साहजिकच ग्रामीण भागातील लोकांना पडला. शेतकरी असो वा रोजंदारीवर काम करणारा खेडुत, प्रत्येकाला चलनचटके सहन करावे लागले. त्याचे हे प्रातिनिधिक शब्दचित्र..

बीडजवळच्या एका वस्तीचे नाव आहे पूरग्रस्त कॉलनी. बहुतांश जण दारिद्रय़रेषेखालची. बहुतेकांचं काम पाठीवरचं. नोटाबंदीच्या निर्णयाला आठ-दहा दिवस झालेले. लक्ष्मी लखन शिंदेंना वाटत होते, बरे झाले, निदान या निमित्ताने श्रीमंतांकडे असलेला काळा पैसा तरी बाहेर पडेल. दररोज ४०० रुपये मिळविणाऱ्या लखनला मालकाने नोटबंदीनंतर १०० रुपयेच दिले, अगदी सलग २० दिवस; पण लक्ष्मीबाई खूश होत्या. म्हणाल्या, आमच्याकडे कुठंय पैसा? ज्यांच्याकडे पैसा आहे त्याला होईल त्रास. खरे तर लक्ष्मीबाईला त्यांच्या संसारात कमी पैसे मिळत होते; शिवाय तीन मुले, हातावरचा संसार, पण सगळं उधारीवर. अजूनही उधारी सुरू आहे. आता लक्ष्मीबाईचा धीर सुटत चालला आहे.

जडगाव हे औरंगाबाद तालुक्यातील हजार-बाराशे लोकवस्तीचे गाव. गावात एकाच बाजूला रेंज येते. नोटबंदी झाली तेव्हा हे गाव रोकडरहित करण्याचा विडा उचलल्यागत प्रशासनाने या गावात बँक खाती उघडली. रेशमाबाई गजरेंकडून तर रात्री ११ वाजता बँकेचा फॉर्म भरून घेण्यात आला. त्यांना म्हटलं, नोटा बंद झाल्यात, पुढचं कसं? त्या म्हणाल्या, आपल्याकडे कधी तरी येणार ५०० रुपये. ्नत्यांनी बँकेनं दिलेल्या खातेपुस्तिकेचे, एटीएमचे पाकीट उघडलेही नव्हते. याच गावातील पांडू हरी गजरेंनी मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवले होते. त्या नोटा कोठे आणि कशा भरायच्या, असा त्यांच्यासमोरचा प्रश्न होता. त्यांची ही अडचण कोणी तरी सोडवली; पण त्यांना मिळणारी मजुरी, तिचं काय याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. बँकमित्रच्या अनेक कंपन्या आता गावोगावी उतरल्या आहेत. त्यांना प्रति व्यवहार ०.३ पैसे मिळतात. जिरोमास, बिट्रोमिक्स, वक्रांगी आणि पेपॉइंट अशा कंपन्या मदतीला आल्याचे चित्र उभे केले जात असले तरी ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी व्यवहार सुरळीत होऊ शकले नाहीत. विशेषत: कापूस उत्पादकांनी अजूनही कापूस पूर्णत: बाहेर काढलेला नाही. उधारीवर घेतलेल्या बियाणांच्या पावत्या आणि किराणा दुकानांकडील नव्या पावत्या घेऊन खिशात घेऊन फिरणारे शेतकरी संभाजी काकडे म्हणाले, जेव्हा बँकेकडे पैसे येतील तेव्हा बघू. एका बाजूला पैसेच नसणाऱ्या रेशमाबाई, दुसरीकडे उधारीच्या पावत्यांमध्ये गुरफटलेले संभाजी काकडे आणि तिसरीकडे मराठवाडय़ातील वैद्यनाथ बँकेचे मुंबईत पकडलेले पैसे. एका रुग्णालयातून आलेली कोटय़वधीची रक्कम. दाखल झालेले गुन्हे, यामुळे आपल्याला पैसे मिळत नाहीत. मग मोठय़ांना पैसे कसे मिळतात, हा प्रश्न या सगळ्यांनाच पडला आहे..