मान्सूनच्या पावसाने हात आखडता घेतल्याने पावसाच्या आशा मावळल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर पाणीटंचाईची नेहमीच ओरड होत असलेल्या लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणात आता केवळ १.२९ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. हा साठा कधीही संपू शकतो. त्यामुळे लातूरकरांना महिन्यातून एकदाच पाणी दिले जाणार आहे.
श्रावणातही मे महिन्यासारखे कडक ऊन झाल्यामुळे उन्हाच्या काहिलीने सगळेच हैराण आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठा पहिल्यांदाच लक्षणीय कमी झाला. जेमतेम एकदा देता येईल इतकेच पाणी धरणात शिल्लक राहणार आहे. यातही बाष्पीभवनामुळे पाणी दररोज कमी होत आहे. ऑक्टोबरमध्ये धरणात शंभर मीटर लांब, शंभर मीटर रुंद व दहा मीटर खोलीची विहीर घेतली जाणार आहे. भूजल विभागाच्या अंदाजानुसार यात पाणीसाठा उपलब्ध होईल. पाणी उपलब्ध झाले, तर ऑक्टोबरमध्ये शहराला पाणीपुरवठय़ास याचा वापर केला जाईल. याच पद्धतीने नागझरी जलाशयातही विहीर खोदली जाईल. तेथेही उपलब्ध झाल्यास पाणी उचलले जाईल.
उजनीतून लातूर शहराला रेल्वेने पाणी पुरवण्याचा पर्याय समोर आला होता. रेल्वेने पाणी आणायचे, तर पंढरपूर रेल्वेस्थानकापर्यंतची जलवाहिनी व लातूर रेल्वेस्थानकावरून पाण्याच्या टाकीपर्यंत वाहिनीचा खर्च ४ कोटी व दरमहा वाहतुकीचा खर्च ७ कोटी. सहा महिने पाणी घ्यायचे झाल्यास ४६ कोटी खर्च लागेल. उस्मानाबादहून रेल्वेने पाणी आणण्यासाठी जलवाहिनीचा खर्च साडेदहा कोटी व दरमहा वाहतुकीचा खर्च ३ कोटी. त्याऐवजी उजनीतून उस्मानाबादला दररोज १६ दशलक्ष लिटर पाणी खेचता येईल इतकी जलवाहिनी आहे. उस्मानाबाद शहराला दररोज ६ दशलक्ष लिटर पाणी घेतले जाते. तेवढीच पाणी खेचण्याची क्षमता अस्तित्वात आहे. संपूर्ण पाणी खेचता येईल, इतकी यंत्रसामुग्री बसवली व धनेगावमधून लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीपर्यंत उस्मानाबादहून वाहिनी जोडल्यास ३२ कोटी रुपये खर्च येईल. टंचाई निवारण झाल्यानंतर सर्व यंत्रसामग्री उस्मानाबादला हस्तांतरित करता येते. वाहतुकीवरील खर्चही वाया जाणार नाही, असा प्रस्ताव लातूर महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत तातडीने याची योग्यता तपासण्याचे आदेश दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सोमवारी (दि. ७) याची पाहणी करून अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर कामाला सुरुवात झाली, तर तीन-साडेतीन महिन्यांत उजनीचे पाणी लातूरला मिळेल. उस्मानाबादहून लातूरला पाणी येणार असले, तरी नागरिकांना दरमहा एकदाच पाणी देता येईल इतकेच पाणी उपलब्ध होणार आहे. पावसाळय़ापर्यंत या पद्धतीने पाणी देता येईल, असे नियोजन महापालिकेतर्फे करण्यात येत असल्याचे आयुक्त तेलंग यांनी सांगितले.
लातूरकरांना महापालिकेने १५ दिवसांतून एकदा पाणी देण्याचे सध्या जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात २० दिवसांतून एकदा पाणी दिले जात आहे. शहरवासीयांची पाण्याची अडचण लक्षात घेऊन शहराच्या विविध भागांत दररोज ३९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मनपातर्फे टँकर सुरू असले, तरी प्रत्यक्षात धनदांडगी मंडळीच धाकधपटशा दाखवून पाणी घेत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता प्रत्येक टँकरवर महापालिकेचा स्वतंत्र कर्मचारी तनात करण्यात येत असून कोणाच्याही घरात थेट पाणी दिले जाणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. जे पाणी खरेदी करु शकत नाहीत, अशा सामान्यांसाठीच महापालिकेने सुविधा देऊ केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठीच याचा वापर व्हावा, या साठी महापालिका प्रयत्न करीत आहे.
दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून नागरिकांनी याची तीव्रता लक्षात घेऊन कमीत कमी पाणी वापरण्याची स्वतला सवय लावून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.