व्यापाऱ्याने ५० किलोच्या कांद्याची गोणी सुरुवातीला दीडशे रुपयालाच मागितली. हात जोडले. आर्जव केली. तेव्हा कुठे दोनशे रुपये मिळाले. चारशे रुपये क्विंटलचा जर कांद्याला भाव मिळत असेल, तर शेतक ऱ्याने जगायचे तरी कसे. कांद्याचे पीक आता आमच्या लेखी आतबट्टय़ाचा व्यवहारच ठरला आहे. मागील आठ महिन्यांत कांद्याच्या दरात फारसा काही फरक पडला नाही. संघटनाही गप्पच आहेत..

कांदा उत्पादक सोमीनाथ भागीनाथ भवर यांची ही उद्विग्नतेने प्रकटलेली प्रतिक्रिया. दोनशे रुपये मिळालेल्या दरातून हाती काय लागते, याचे गणितच सोमीनाथ भवर यांनी मांडले. भवर हे औरंगाबादपासून २५ किलोमीटर अंतरावरील गंगापूर तालुक्यातील टेकळवाडीचे. तेथून कांद्याच्या गोणीला ३० रुपये भाडे देऊन मालवाहूतुकीच्या टेम्पोतून औरंगाबाद येथे आणले. रविवारच्या आठवडी बाजारात ती गोणी ठेवण्यासाठी १० रुपये आकारले जातात. येण्याजाण्याचे भाडे मिळून ५० रुपये खर्च होतात. दोनशे रुपयांच्या गोणीतून ९० रुपये असेच खर्च झाले. आता दिसतो तो नफा ११० रुपयांचा. पण त्यात उत्पादनाचा खर्च व अन्य बाबींचा विचारच केला नाही. याशिवाय कांदा सहा महिने घरात सांभाळला, तो भाग वेगळाच. यासंदर्भाच्या खर्चाचा लेखाजोखा सोमीनाथ भवर समोर मांडतात. रब्बीनंतर रिकाम्या शेतातून पावसाळ्यापर्यंत एखादे पीक घेण्यासाठी कांदा तसा उत्तम पर्याय. चार महिन्यात पीक हाती येते. खरिपाच्या तोंडावर खत, बियाण्यासाठी हाती पैसा येण्याची आशा असते. तसा विचार करूनच शेतकरी कांद्याची लागवड करतो. पण या सर्व आशेवर सद्याच्या गडगडलेल्या दराने पाणी फेरले आहे.

एकरी ५० ते ७० हजार रुपये खर्च कांदा उत्पानासाठी येतो. लागवडीसाठीच सात हजार रुपये मोजावे लागतात. रोपे वेगळी. ढोर खत, राशन खत, फॉस्फेट, फवारणी, खुरपणी, पाणी, असा खर्च कांदा उत्पादनासाठी करावा लागतो. उत्पादन खर्च आणि आजचा भाव पाहता कांद्याला आतबट्टय़ाचा व्यवहार म्हणावे, नाहीतर काय, असा सवाल शेतकरी भवर करतात.