प्रतिकिलो दहा रुपये हमीभावाची मागणी

कांद्याला कवडीमोल भाव मिळू लागल्याने शेतकरी आíथक संकटात सापडला असून, संतप्त कांदा उत्पादकांनी माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. कांद्याला प्रति किलो दहा रुपयांचा हमी भाव द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यात कांद्याचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हताश झाला असून, बुधवार, ३१ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या कांदा उत्पादकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून प्रशासनाला निवेदन

दिले. कांद्याला प्रति किलो दहा रुपये हमी भाव द्यावा, पीक अनुदानापासून वंचित असलेल्या ५३ गावांना अनुदान द्यावे, पीक विमा व ठिबक साठीचे अनुदान तात्काळ वाटप करावे. दुष्काळामुळे बाधित झालेल्या फळबागांना मदत देण्यात यावी, पावसाअभावी सध्या पिके सुकू लागली आहेत, त्याचे पंचनामे करावेत आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. कडा (ता.आष्टी) येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत नसला तरी बदलत्या वातावरणामुळे कांदा सडण्याचे प्रकारही वाढले आहेत.