विकास साधायचा असेल तर केवळ लोकप्रिय निर्णय घेऊन चालणार नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते शनिवारी औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय महापौर परिषदेत बोलत होते. या परिषदेत अनेकांनी महापौरांना जादा अधिकार मिळावेत, अशी आग्रही मागणी केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले की, अनेकदा महापौरांना त्यांच्या अधिकारांची पूर्ण माहिती नसते. आपल्याला नेमके कोणते अधिकार आहेत आणि त्याचा वापर कसा करावा, याची माहिती असायला हवी. मात्र, आम्ही महाराष्ट्रातील महापौरांना अधिकाअधिक अधिकार देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शहर बदलायचे असेल तर फक्त लोकप्रिय निर्णय घेऊन चालणार नाही. त्यासाठी जनतेला सोबत घेऊन काम करायला हवं. महापौरांच्या अधिकारावर चर्चा झाली पाहिजे. त्यासोबत देशाचा विकास करण्यासाठी काय करायला हवं, याचाही विचार करावा असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालिकेतील ड वर्ग आणि क वर्ग याची निवडणूक थेट घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विकासाच्या पथावर घेऊन जात असताना आपल्या समोर अनेक समस्या आहेत. लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. मात्र, शहरं ज्या वेगानं वाढत आहेत, त्या गतीनं विकास होत नाही. हे साध्य करायचे असेल तर, नियोजन असणं महत्वाचं आहे. निश्चित योजना तयार असेल आणि ती साध्य करण्याची इच्छाशक्ती असेल तर पैशाची कमी येणार नाही, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.