सेवाभावी संस्थांची कामे चांगली असली तरी त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते, पुलाच्या बाजूला बंधारे बांधण्यात आले तर एकाच तालुक्यात ४७ जेसीबी यंत्रे आणि इतर तालुक्यांत काहीच नाही. त्यामुळे यापुढे सेवाभावी संस्थांनी काम करताना जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाची आवश्यकता आणि तांत्रिक परवानगी घेऊनच काम करावे, असा नियम करावा लागेल, तरच सेवाभावी संस्थेकडून होणारी कामे योग्य व सर्वसमावेशक होतील, असे मत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

कर्ज न घेता शेतकऱ्यांच्या जमिनीवर बँकांनी टाकलेला बोजा तत्काळ कमी करावा अन्यथा शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हा नियोजन समितीची बठक पालकमंत्री मुंडे यांच्या उपस्थितीत झाली. नियोजन अधिकारी आर. टी. बागल यांनी सादर केलेल्या मागील वर्षीच्या २६७ कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री मुंडे यांनी सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात कामे झाली. या बरोबरच विविध सामाजिक संस्थांनीही सिंचनाच्या कामात पुढाकार घेतला, मात्र सेवाभावी संस्थांची कामे चांगली असली तरी ती अर्निबधपणे झाली आहेत. आपण स्वत: एक बंधारा पाहिला. तो रस्त्याच्या पुलालगत बांधल्याचे दिसून आले, तर नद्यांचे खोलीकरण करण्यासाठी केज या एकाच तालुक्यात ४७ जेसीबी देण्यात आले. आष्टीत मात्र मशीन मिळाल्या नाहीत. एकाच भागात मोठय़ा प्रमाणावर कामे झाल्याने सेवाभावी संस्थांच्या कामावरही नियंत्रण असणे आवश्यक आहे.

यापुढे सेवाभावी संस्थांना कामे करताना जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणत्या भागात काम करायचे याची आवश्यकता आणि तांत्रिक परवानगी घेण्याचा नियम करावा लागेल, तरच सर्वसमावेशक कामे होतील, असे मत त्यांनी मांडले.

कर्ज न घेताही अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर बँकांनी बोजा टाकला आहे. तो तत्काळ कमी करावा अन्यथा शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून संबंधित बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी नागरी व ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचे वाटप व्हावे, अशी मागणी केली तर आमदार भीमराव धोंडे यांनी रस्त्याची कामे मंजूर करताना तालुक्यापेक्षाही मतदारसंघाच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करावा, अशी सूचना केली. खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, आर. टी. देशमुख, संगीता ठोंबरे, लक्ष्मण पवार, भीमराव धोंडे, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, सभापती बजरंग सोनवणे, महेंद्र गर्जे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे आदी उपस्थित होते.