भगवान गडावर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संत भगवान बाबांच्या जन्म गावी मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर सावरगाव येथील दसऱ्या मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. संत भगवान बाबांच्या जन्मभूमीतील दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडेंनी जय्यत तयारी केली आहे. शनिवारी पंकजा मुंडें हेलिकॉप्टरने सावरगावला रवाना होणार असल्याचे समजते. या लक्षवेधी मेळाव्यात त्यांच्यासोबत भाजपचे काही मंत्री देखील असण्याची शक्यता आहे.

जिल्हा प्रशासनाने भगवानगडावर मेळावा घेण्यास परवानगी नाकारल्यानंतर भगवान बाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळावा घेण्याची विनंती सावरगांव घाट येथील ग्रामस्थांनी पंकजा मुंडे यांच्याकडे केली होती. ही विनंती मान्य केल्यानंतर मेळाव्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली. सुमारे पंधरा एकर परिसरात हा मेळावा होणार असून मंडप उभारणीचे तसेच साफसफाईचे काम वेगाने सुरु आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून समर्थक येणार आहेत.

दसरा मेळाव्याला कोणतीच कसर बाकी राहू नये यासाठी पूर्णपणे तयारी करण्यात येत आहे. वातावरण निर्मितीसाठी खासदार प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उद्या गोपीनाथगड ते सावरगांव घाट अशी वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी ७ वाजता गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्या रॅलीला सुरुवात करतील. सिरसाळा, तेलगांव, वडवणी, बीड, वंजारवाडी, पिठ्ठी नायगाव, ताबा राजुरी, वांजरा फाटा, कुसळंब मार्गे सकाळी ११.३० वाजता ही रॅली सावरगांव घाट येथे पोहोचेल.