औरंगाबाद शहरातील मोबाईल चोरींच्या घटनांचा छडा लावताना पोलिसांनी कुख्यात गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसात औरंगाबाद पोलिसांत मोबाईल चोरीचे १२७ गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी ‘स्मार्टफोन’ ऑपरेशनच्या माध्यमातून गुन्हेगारांना पकडण्यास सुरुवात केली. यामध्ये पोलिसांनी तब्बल ९२ गुन्ह्यांचा शोध लावून मुद्देमालासह अटक केली. या मोहिमेत कुख्यात गुंड कलिम खान शबीर खान उर्फ कल्ल्या या गुन्हेगाराला उस्मानपुरा पोलिसांनी परभणी पोलिसांच्या मदतीने परभणीमधून अटक केली. कलिमचा पोलिस बऱ्याच दिवसांपासून शोध घेत होते. त्याच्या विरोधात चोरीचे तब्बल ३६ गुन्हे दाखल आहेत. कलिमने त्याच्या विरोधातील गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. पोलिसांवर हल्ला करण्यात पटाईत असणाऱ्या कलिमला मोबाईल ट्रेसिंग दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले. या मोहिमेत कलिमशिवाय वाळूज एमआयडीसी परिसरात गुन्हेगारीत सक्रिय असणाऱ्या एका टोळीलाही पोलिसांनी अटक केली.

औरंगाबादमधील उस्मानपुरा भागातील चोरीला गेलेल्या एका मोबाईलच लोकेशन परभणी दाखवत होत. पोलिसांनी त्या नंबरवर फोन केला. हा फोन सिकंदर नावाच्या व्यक्तिने उचलला. यावेळी त्याने हा फोन त्याच्याकडे राहत असलेला भाडेकरू कलिम याने दिल्याचे संगितले. यावेळी वॉन्टेंड असणारा हा कलिम गुंड आहे, याची पोलिसांना कल्पना नव्हती. साध्या वेशातील पोलिस ज्यावेळी त्याला पकडण्यासाठी गेले, साध्या वेशातील पोलिसांना पाहून कलिमने पळ काढला. पाठलाग करुन पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.  मोबाईल चोरांना  पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात औरंगाबाद पोलिसांना हवा असणारा वॉन्टेंड गुंड पोलिसांच्या हाती लागल्यामुळे सायबरसेलच्या मोहिमेतील हे मोठे यशच म्हणावे लागेल.