तालुक्यातील कसबे तडवळे येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत पोलीस लाईनची साडेसतरा हजार चौरसफुट पडीक जागा आहे. ती जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कसबे तडवळे ग्रामपंचायतीच्या वतीने गृहराज्यमंत्री प्रा. राम िशदे यांच्याकडे केली आहे.
गृहराज्यमंत्री राम िशदे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. त्यावेळी कसबे तडवळे ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. तडवळे गावात पोलीस लाईनची २५० बाय ७० अशी एकूण १७ हजार ५०० चौरस फुट पडीक जागा आहे. ही जागा सध्या ढोकी पोलीस ठाण्यांतर्गत येते. गेल्या ३० वषार्ंपासून ही जागा पडीक आहे. याठिकाणी कुणाचेही वास्तव्य नाही. या जागेत दीड हजार चौरस फुटामध्ये पडलेली दगडी इमारत आहे. उर्वरित १६ हजार चौरसफुट जागा रिकामी आहे. या जागेत ढोकी पोलीस ठाणे अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रहिवासी इमारत बांधावी याबाबत ढोकी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्याशी वारंवार चर्चा करून बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे ही जागा गेल्या ३० वर्षांपासून वापराविना पडून आहे. सध्या या जागेचा वापर गावातील नागरिक स्वच्छतागृहासारखा करीत आहेत. इमारतीमध्ये लघवी, संडास करीत असल्याने परिसरात दरुगधी पसरली आहे. परिणामी शेजारच्या रहिवाशांना भयंकर त्रास होत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत २२ व २३ फेब्रुवारी १९४१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महार, मांग, वतन परिषद घेतली होती. सध्या या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करण्याच्या हालचाली सुरू आहेत. संबंधित खात्याचे मंत्री, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतनेही यासाठी पुढाकार घेतला आहे. शाळेच्या इमारती पाडून स्मारक होणार असल्याने शाळेला दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध होणार नाही. गावठाण हद्दीमध्ये शाळा बांधकाम करण्यासाठी पोलीस लाईनच्या जागेशिवाय दुसरी जागा नाही. त्यामुळे पोलीस लाईनची १७ गुंठे जागा राष्ट्रीय स्मारकाच्या पूर्णत्वासाठी नवीन प्राथमिक शाळेच्या बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळात सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह ग्रामस्थांचा समावेश होता.