परीक्षा मंडळाच्या महाविद्यालयांना नोटिसा, निकाल लांबण्याची शक्यता

अनुदान मिळावे, यासाठी उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर प्राध्यापकांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे औरंगाबाद विभागातील एक हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत आले. आजही ४७१ गठ्ठे पडून आहेत. एका गठ्ठय़ात २०० उत्तरपत्रिका असतात. तपासणीविना उत्तरपत्रिका परत येत असल्याने परीक्षांचे निकाल वेळेवर लागण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गठ्ठे परत करणाऱ्या महाविद्यालयांना परीक्षा मंडळाने कारणे दाखवा नोटिसाही बजावल्या आहेत. विशेषत: इंग्रजी व गणिताच्या उत्तरपत्रिका अधिक प्रमाणात परत येत असल्याचे अधिकारी सांगतात. विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राचार्याना विनंती करून त्यांना उत्तरपत्रिका तपासणीची विनंती केली जात असल्याचे औरंगाबाद विभागाच्या विभागीय परीक्षा मंडळाच्या सचिव वंदना वाहुळ यांनी सांगितले.

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, हिंगोली या पाच जिल्हय़ांत ३०० अनुदानित तर ७५० विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. अनुदानाच्या मागणीसाठी प्राध्यापकांनी उत्तरपत्रिकेवर बहिष्कार टाकलेला असल्याने दररोज तपासणीसाठी पाठविलेले गठ्ठे परत येत आहेत. या प्रकारामुळे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशाच्या विद्यार्थ्यांची अडचण होऊ शकते, असे सांगितले जाते. निकाल वेळेवर लागेल काय, याचे उत्तर मात्र लगेच देता येणार नाही. कारण उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापक उपलब्ध नाहीत, अशी उत्तरे प्राचार्य परीक्षा मंडळातील अधिकाऱ्यांना देत आहेत. या वर्षी मराठवाडय़ातील पाच जिल्हय़ांमधून दहावीसाठी १ लाख ९१ हजार ४८८ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. तर १२वीच्या परीक्षेसाठी १ लाख ७० हजार ३३७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील विनाअनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका कोणाकडून तपासून घ्यायच्या, असा पेच निर्माण झाला आहे. एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पूर्वी ४ रुपये ५० पैसे एवढे मानधन मिळत असे, आता त्यात वाढ करण्यात आली आहे. या वर्षी प्रत्येक उत्तरपत्रिकेमागे ५ रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र, अनुदान हा प्रश्न सरकारच्या कोर्टात असल्याने उत्तरपत्रिका तपासून घेण्यासाठी परीक्षा मंडळातील अधिकाऱ्यांना प्राचार्याची मनधरणी करावी लागत आहे. शिक्षण उपसंचालकांचीही या कामासाठी मदत घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.