मराठवाडय़ातून कर्ज बुडवेगिरी करणाऱ्यांमध्येही मद्यार्क क्षेत्रातील व्यक्ती म्हणून पंचायत राज्य समिती अध्यक्ष संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव नुकतेच ऋण वसुली न्यायाधिकरणाने दिले. यानंतर दुष्काळी मराठवाडय़ात बुडवेगिरीची केवळ महाराष्ट्र बँकेची व्याप्ती सुमारे ६० कोटी रुपयांची असल्याची माहिती मिळाली. वेगवेगळय़ा ९५ प्रकरणांत बँकेने न्यायाधिकरणाकडे दाद मागितली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मराठवाडय़ातील बहुतांश साखर कारखाने आणि व्यावसायिकांनी कोटय़वधी रुपये बुडविले आहेत. निलंगेकर यांच्या संपत्तीवर टाच आणण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात काही तडजोड होण्याचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. ही तडतोड करता येत नसल्याचे मत व्यक्त होत आहे. ज्या व्यक्तीचे नाव कर्ज बुडविणाऱ्यांच्या यादीत येते त्यांच्याबरोबर चर्चा करता येते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. केंद्रीय अर्थ समितीच्या बठकीतही यावर चर्चा झाली असून, त्याबाबत निर्देशही देण्यात आले आहेत.
या अनुषंगाने केंद्रीय अर्थ स्थायी समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, की त्यांनी कर्ज परत केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर झालेली कारवाई न्यायालयाने केली. या पुढेही कायद्याने कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करू.
दरम्यान, मराठवाडय़ासारख्या मागास भागात एक कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेऊन ते बुडविणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचेही दिसून आले आहे.