विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधकांच्या संशोधनपर लेख, ग्रंथाचा दर्जा आंतरराष्ट्रीय असला पाहिजे. तरच त्याची दखल घेतली जाऊ शकते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र व माहिती-तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य भाऊसाहेब राजळे, बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, न्यूरो सर्जन डॉ. जीवन राजपूत, डॉ. अरुण मारवले आदी या वेळी उपस्थित होते. ‘इंटरॅक्शन टू ईईजी अॅण्ड स्पीच बेस्ड इमोशन रिकगनिशन’ या विषयावरील ग्रंथाचे लेखन प्रा. एस. सी. मेहरोत्रा, डॉ. भारती गवळी, प्रियंका अभंग यांनी केले आहे. ‘सिस्टीम कम्युनिकेशन अॅण्ड मशिन लर्निग रीसर्च लॅबोरेटरी’ अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला.
अॅकॅडमिक प्रेसच्या वतीने पुस्तक प्रकाशित होत असल्याचे समाधान आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानांकनासाठी विद्यापीठातील संशोधक व प्राध्यापकांचे लेख, प्रकल्प, ग्रंथ दर्जेदार असणे गरजेचे आहे. पेटंट, कॉपीराईट, ट्रेड मार्क याला खूप महत्त्व आले आहे. अशा लेखनाला विद्यापीठाकडून प्रोत्साहन, अनुदान दिले जाईल, असे डॉ. चोपडे म्हणाले.
विद्यापीठाला डॉ. के. बी. देशपांडे, डॉ. नागभूषणम, डॉ. पाचपट्टे, डॉ. मोईन शाकेर अशा जगप्रसिद्ध प्राध्यापकांची परंपरा आहे. नव्या पिढीतील प्राध्यापकांनी हा वारसा नेटाने पुढे नेला पाहिजे, असे भाऊसाहेब राजळे म्हणाले. डॉ. मेहरोत्रा यांनी प्रास्ताविक केले. वैशाली जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भारती गवळी यांनी आभार मानले.