गेवराई (जि. बीड) शहरातील सरस्वती कॉलनी परिसरात बुधवारी पहाटे दरोडेखोरांनी एका दाम्पत्याची हत्या करत लाखो रूपयांचा ऐवज लांबविला. या घटनेने संपूर्ण गेवराई तालुका हादरला आहे. आदिनाथ उत्तम घाडगे (वय ५०) व अलका आदिनाथ घाडगे (वय ४५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. त्यांची विवाहित मुलगी वर्षा ही गंभीर जखमी असून तिचे दोन महिन्याचे बाळ सुरक्षित आहे.

आदिनाथ घाडगे हे जयभवानी बँकेत वसुली अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची कन्या वर्षा प्रसुतीसाठी माहेरी आलेली असून तिला दोन महिन्यांचे बाळ आहे. दरोडेखोरांनी पहाटे दोन वाजता घाडगे यांच्या घरावर हल्ला केला. दरवाजा तोडून आत घुसलेल्या दरोडेखोरांनी झोपेत असलेल्या आदिनाथ व त्यांच्या पत्नी अलका यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांची निघृण हत्या केली. आई- वडिलांच्या विव्हळण्याचा आवाज ऐकून बाजूच्या खोलीत झोपलेल्या वर्षाने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दरोडेखोरांनी तिच्यावरही हल्ला चढवला. बाळाला उराशी कवटाळून तिने दरोडेखोरांनी केलेले वार स्वतः झेलले. ती गंभीर जखमी असून तिला उपचारासाठी औरंगाबादला नेले आहे. शिवाय त्यांची दुसरी मुलगी स्वाती (वय १८) ही देखील जखमी असून तिलाही औरंगाबादला उपचारासाठी हलविले असल्याचे समजते.

दरम्यान घाडगे यांच्या घरातील दोन्ही कपाट तुटलेले आढळून आले. लाखोंचा ऐवज लंपास असून वर्षाचा जवाब घेतल्यानंतर घटनाक्रम समोर येईल असे निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी सांगितले. दरम्यान घटनास्थळी गेवराई पोलीस पोहचले, परंतु तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासह इतर अधिकारी गेवराईत तळ ठोकून आहेत. तपासासाठी चार पथके रवाना केली असून सर्वत्र नाकाबंदी केली आहे.