सहारणपूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या प्रकरणी पोलिसांनी १७ जणांना अटक केली असून त्यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.

बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टीकडून योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निदर्शन करण्यात येणार होती. सहारणपूर येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी रितसर परवानगी घेऊन या आंदोलनाला सुरुवात झाली. मात्र, कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात काही आंदोलनकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांमधील १७ जणांना अटक केली. त्यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशमधील सहारनपूरच्या शब्बीरपूर गावात उसळलेल्या जातीय हिंसाचारात एका तरूणाचा मृत्यू झाला होता.  त्यानंतर सहारनपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर पोलीस आणि प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी सहारनपूर परिसरात ठाण मांडली होती. याच घटनेच्या  निषेधार्थ बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी रस्त्यावर उतरली. रितसर परवानगीने आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर अचानक आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. काही आंदोलकांनी अदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.