वाढदिवसाच्या उत्सवातून पालिकेत स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत

शहराच्या मुख्य रस्त्यापासून गल्लीबोळापर्यंत अभीष्टचिंतनासाठी लागलेल्या फलकावरील मोजकीच छायाचित्रे, नेमका संदेश देणारा मजकूर आणि दिवसभर जागोजागी सामाजिक उपक्रमातून झालेले शक्ती प्रदर्शन, यामुळे क्षीरसागर कुटुंबातील युवा नेते सभापती संदीप क्षीरसागर यांनी जन्मदिनाच्या उत्सवातून उघडपणे नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याची तयारीच केल्याचे मानले जात आहे.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत

काही दिवसांपासून क्षीरसागर काका-पुतण्यात सुरू असलेला सुप्त ‘संघर्ष’ वाढदिवसाच्या कार्यक्रमातून ठळकपणे समोर आला. त्यामुळे राजकीय प्रभावक्षेत्रात पुतण्याने ‘आक्रमण’ करून उभे केलेले आव्हान ‘काका’ कसे पेलणार, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

बीड नगरपालिकेवर सलग तीस वषार्ंपेक्षा अधिक काळ एकहाती सत्ता कायम ठेवल्याने डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना ‘अध्यक्षसाहेब’ याच नावाने ओळखले जाते. क्षीरसागर कुटुंबात राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे शहर, तर गजानन कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर व त्यांचा मुलगा सभापती संदीप क्षीरसागर यांच्याकडे ग्रामीण भाग अशी विभागणी राहिली आहे. राज्यात सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्याही ‘लाटा’ आल्या तरी क्षीरसागर बंधूंनी शहर व ग्रामीण भागात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वत्र राष्ट्रवादी व काँग्रेसचा सफाया झाला. मात्र जयदत्त क्षीरसागर यांनी आपला मतदारसंघ राखला. मागील काही दिवसांपासून क्षीरसागर कुटुंबात डॉ. भारतभूषण क्षीरसागर व संदीप क्षीरसागर या ‘काका-पुतण्या’ तील सुप्त ‘संघर्ष’ अनेक कार्यक्रमांतून समोर आला आहे.

या पाश्र्वभूमीवर शनिवारी संदीप क्षीरसागर यांनी वाढदिवसानिमित्त शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची संधी साधली. मुख्य रस्त्यापासून गल्लीबोळापर्यंत संदीप यांचे अभीष्टचिंतन करणारे फलक लागले. या शुभेच्छा फलकांवर केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि जयदत्त क्षीरसागर व रवींद्र क्षीरसागर यांचीच छायाचित्रे झळकली. कुठेही डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची छबी दिसली नाही. तर डॉ. क्षीरसागर यांचे कार्यकत्रेही या उत्सवापासून अलिप्त दिसले. संदीप क्षीरसागर यांनी अत्यंत कमी वयात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये सहजपणे मिसळणे, सरळ भाषेतील वक्तृत्वाने लोकांना आपलेसे करण्यात यश मिळवले आहे. कायम कार्यकर्त्यांच्या गराडय़ात राहत असल्याने तरुणांमध्ये त्यांचे प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून संदीप यांनी शहरातील प्रत्येक  प्रभागात आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यकर्त्यांच्या शक्तीचे जोरदार प्रदर्शन ठळकपणे झाले. सलग तीस वर्षांपेक्षा अधिक काळ नगरपालिकेच्या सर्व जागा आपल्या ताब्यात ठेवण्याची किमया करणाऱ्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यापुढे अनेक दिग्गज विरोधकांनाही ‘आव्हान’ उभे करणे शक्य झाले नव्हते. मात्र संदीप यांनी वाढदिवसाच्या उत्सवातून अप्रत्यक्षपणे शहरात आगामी नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरण्याचेच संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय प्रभावक्षेत्रात पुतण्याने ‘आक्रमण’ करुन उभे केलेले ‘आव्हान’ काका कसे पेलणार, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.